Breaking

Friday, June 28, 2024

दिलासादायक! मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती https://ift.tt/QdtTUvu

मुंबई:‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. हे काम प्रगतीपथावर आहे. सर्व कामे डिसेंबर अखेर पूर्ण करणार आहे’, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली. महामार्गाच्या या विषयावर विरोधी पक्षातील सदस्यांशी त्यांची खडाजंगी झाली. त्यामुळे सभागृह तहकूब करावे लागले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत विधान परिषदेत विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘गेली १७ वर्षे मी सभागृहात असून, असे एकही अधिवेशन गेले नाही, की ज्यात या महामार्गाविषयी प्रश्न विचारण्यात आला नाही. किमान यावर्षी तरी हा महामार्ग पूर्ण होणार का?’, असा सवाल काळे यांनी विचारला. ‘एकीकडे देशाने एका दिवसात ३० किलोमीटरचे रस्ते बांधून विक्रम करीत गिनीज बुकमध्ये आपले नाव कोरले, तर दुसरीकडे दोन दशके हे काम सुरूच आहे’, अशी टीकाही त्यांनी केली. यावर मंत्री चव्हाण यांनी उत्तर दिले. ‘पनवेल ते कासू यामधील काम जवळपास पूर्ण झाले असून, फक्त सेवा रस्ते व गडब येथील भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. कासू ते इंदापूरमधील ७२ टक्के काम पूर्ण झाले असून, भुयारी मार्ग, उड्डाणपुलांचे काम प्रगतीपथावर आहे’, असे चव्हाण म्हणाले. मात्र, या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधी पक्षातील अनिल परब, भाई जगताप आणि सचिन अहिर यांनी मंत्र्यांवर टीका करण्यास सुरुवात केली. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृह तहकूब केले.

झालेले काम...राहिलेले काम...

‘इंदापूर ते झारापमधील रस्ता राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत आहे. या लांबीमधील ८५ टक्के काम पूर्ण झालेले असून, उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. इंदापूर ते झाराप या लांबीमध्ये एकूण १० पॅकेजेसच्या कामांसाठी मंजूर असलेल्या एकूण ६१००.४४ कोटी एवढ्या रक्कमेपैकी आजपर्यंत ३५८०.३३ कोटी रुपये एवढा खर्च झाला आहे. एकूण ३५५.२८ किमी संकल्पित लांबीपैकी २९५.४०२ किमी लांबीचे काम (सुमारे ८५ टक्के) पूर्ण झाले आहे. महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे’, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/iTlSK6v

No comments:

Post a Comment