अमुलकुमार जैन, रायगड : उरण तालुक्यातील पिरकोन गावात निरा पाटील (२५) आणि त्यांचा मुलगा रिहान पाटील (७) गावातील तळ्यावर संध्याकाळी कपडे धुण्यासाठी गेले होते. आई कपडे धुण्याच्या कामात व्यस्त असताना अचानक रिहानचा पाय पायरीवरून घसरला आणि तो तळ्यात गटांगळ्या खाऊ लागला. रिहानला बुडताना पाहून वाचवण्यासाठी त्याची आई निरा पाटील तळ्यात उतरल्या. रिहानला बुडताना पाहून वाचवण्यासाठी आईने थेट तळ्यात उडी घेतली. मात्र, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही दुर्दैवाने बुडून मृत्यू झाला.तळ्यात कपडे धुण्यासाठी गेलेले मायलेक संध्याकाळी साडेसात वाजले तरी घरी परत आले नाहीत. यामुळे काळजीत पडलेल्या निरा यांचे सासरे तळ्याकाठी पाहण्यासाठी आले. त्यांना तळ्याकाठी आपल्या सुनेने धुण्यासाठी आणलेले कपडे आणि चपला दिसल्या. मात्र, सून निरा आणि नातू रिहान कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. त्यानंतर तळ्यात तर बुडाले नसतील ना? अशी शंका त्यांच्या मनात आली आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आरडा-ओरडा ऐकून ग्रामस्थ तळ्याकाठी आले. त्यांनी तळ्यात शोध घेतला असता आई आणि मुलगा रिहान बुडालेल्या अवस्थेतही एकमेकांच्या हातात हात घालून मृत्युमुखी पडल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळालं. दोघांचाही नाका-तोंडात पाणी जाऊन मृत्यू झाला होता. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली. मात्र, माय-लेकराचा अशा रीतीने दुदैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्रात उधाण येणार असल्याचं महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सांगण्यात आलं आहे. २० सप्टेंबरला सर्वांत मोठी भरती अनुभवता येणार असून रायगड जिल्ह्यातील ११४ गावांमध्ये साडेचार मीटरपेक्षाही उंच लाटांचा सामना करावा लागणार आहे. यामुळे पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याने किनाऱ्याजवळील गावातील, कुटुंबांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NQsqIuW
No comments:
Post a Comment