Breaking

Sunday, July 21, 2024

दुकानांना नामफलकाचे बंधन, नियमाचे पालन न करणाऱ्यांवर होणार कारवाई, जाणून घ्या दंडाची रक्कम https://ift.tt/dJwn9go

मुझफ्फरनगर: उत्तर भारतातील कावड यात्रामार्गावरील सर्व उपाहारगृहे, ढाबे तसेच रस्त्यावरील ठेलेवाल्यांनी दुकानावर मालकाचे नाव जाहीर करावे, अशा सूचना उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने दिल्यानंतर आता भाजपचीच सत्ता असलेल्या महाकाल मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या उज्जैन शहरातील दुकानदारांनाही दुकानमालकाचे नाव आणि मोबाइल क्रमांक दुकानांवर देण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत.या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर दंडही आकारला जाणार आहे. पहिल्यांदा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना दोन हजार रुपये तर, दुसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असे उज्जैनचे महापौर मुकेश टटवाल यांनी शनिवारी स्पष्ट केले. भाविकांची सुरक्षा आणि पादर्शकता राहावी, या उद्देशाने हा आदेश काढण्यात आला असून कोणत्याही मुस्लिम दुकानदारांना लक्ष्य करण्याचा हेतू नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव याच उज्जैन शहरातील आहेत. हे शहर येथील महाकाल मंदिरासाठी सुप्रसिद्ध असून श्रावण महिन्यात हजारो भाविक येथे येत असतात. सोमवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. ‘उज्जैनच्या महापौर-परिषदेने २६ सप्टेंबर २००२ रोजी दुकानदारांनी त्यांचे नाव दुकानांवर दर्शनी भागात लावण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर हरकती आणि अन्य सोपस्कार पूर्ण करण्यासाठी तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. सर्व सोपस्कार आधीच पूर्ण झाले आहेत. सुरुवातीला सर्व नामफलक समान आकाराचे आणि रंगाचे असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे अंमलबजावणीला उशीर झाला. आता आम्ही या अटी शिथिल केल्या आहेत. दुकानदारांची नावे आणि मोबाइल नंबर दर्शनी भागात लावणे पुरेसे आहे,’ असे टटवाल यांनी स्पष्ट केले.

एनडीएमधील राष्ट्रीय लोक दलाचा विरोधी सूर

एनडीएतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्य मंत्री जयंत चौधरी यांनी रविवारी उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशावर टीका केली. उपाहारगृहे आणि ढाबेमालकांना त्यांचे नाव दर्शनी भागात लावण्याचा नियम सरकारने मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. ‘अजूनही वेळ निघून गेलेली नाही. आताही हा निर्णय मागे घेतला जाऊ शकतो,’ असे ते म्हणाले. कावडिया जेव्हा एखाद्याकडून कोणतीही सेवा घेतात, तेव्हा ते कोणालाही त्यांचा धर्म विचारत नाहीत. कावडियांची सेवा ही बाब कोणत्याही धर्माशी जोडली जाऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.

नूहमधील यात्रेच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंद

हरियाणा सरकारने ब्रज मंडल जलाभिषेक यात्रेच्या आधी नूंह जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट आणि एकावेळी अनेकांना एसएमएस पाठवणारी सेवा २४ तासांसाठी खंडित करण्याचा आदेश रविवारी दिला आहे. गेल्या वर्षी या यात्रेदरम्यान हिंसाचार झाला होता. हरियाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अनुराग रस्तोगी यांनी दिलेल्या आदेशानुसार, रविवार संध्याकाळ सहा वाजल्यापासून ते सोमवार संध्याकाळ सहा वाजेपर्यंत ही सेवा खंडित राहील. नूंह जिल्ह्यात तणाव, आंदोलन, तसेच, सार्वजनिक शांतता व सौहार्द बिघडण्याची भीती आहे. त्यामुळे अफवांना रोखण्यासाठी हा आदेश दिल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/aTo9lNp

No comments:

Post a Comment