नागपूर: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आक्रमक पवित्रा घेत आघाडी घेतली. सर्व २८८ मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. काँग्रेसचेही शत प्रतिशतची तयारी, चाचपणी की संघटन बांधणी याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. महाआघाडीत आणखी कोणते पक्ष सहभागी होतात आणि सूत्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. येत्या १५ जुलैपर्यंत महाविकास आघाडीच्या जागा निश्चित होतील, असे संकेत काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी दिले. असे असेल तरी, काँग्रेसने इच्छुकांकडून अर्जाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू केली. येत्या १० ऑगस्टपर्यंत अर्ज मागवले आहेत. इच्छुकांकडून सविस्तर माहितीसह प्रतिज्ञा पत्रही भरून घेण्यात येणार आहे. अर्जासोबत शुल्कही आकारले जाणार आहेत. उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करणार नाही, अर्जासोबतचे शुल्क परत मागणार नाही आदी मुद्दे प्रतिज्ञापत्रात आहेत. पक्षाचे मुखपत्र असलेल्या शिदोरीचे वर्गणीदार होण्याची सूचनाही केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली. जागांबाबत वाटाघाटीसह दावे-प्रतिदावे केले जात आहे. काँग्रेसने सर्व जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज बोलावल्याने मित्रपक्षासह दावेदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पक्षाची ही नियमित प्रक्रिया आहे. मात्र, यावेळी जागा निश्चित होण्यापूर्वी व बऱ्याच आधी पक्षाने आघाडी घेतल्याने संमिश्र प्रतिक्रिया उमटली. प्रबळ दावेदारांना इच्छुकांचा अंदाज येईल व त्यानुसार मोर्चेबांधणी केली जाईल. यातून बंडखोरांची कल्पना येऊ शकते व डॅमेज कंट्रोलसाठी पावले उचलता येतील, असे मत एका नेत्याने व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सातत्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यास प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही साथ दिली आहे. पक्षाने सर्वाधिक भर विदर्भावर दिला. सत्तेचा मार्ग सुकर करण्यासाठी मित्रपक्षाला ६२ पैकी किमान जागा द्याव्या, अशी बहुतांश नेत्यांची भूमिका आहे. जाहीरपणे यावर कुणी बोलत नाही. मात्र, पक्षाने अधिकाधिक जागांवर दावा करावे, असे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, प्रदेश काँग्रेसने १२ जुलै रोजी प्रदेश पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. चेन्नीथला व पटोले यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते बैठकीस उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा, मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम, विधानसभा निवडणुकीची चर्चा आणि संघटनात्मक स्थितीचा आढावा व जिल्हा पातळीवरील रिक्त पदांवर नियुक्ती आदी मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे, असे पत्र प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना पाठवले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/yqsYkAi
No comments:
Post a Comment