नवी दिल्ली: शहरात कोचिंग क्लासमधील दुर्घटनेनंतर रविवारपासून अवैध कोचिंग क्लासना ‘सील’ लावण्याची कारवाई सुरू आहे. दिल्लीबरोबरच अन्य शहरांमध्येही कोचिंग क्लासेसवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.दिल्ली महापालिकेने क्लासविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. आतापर्यंत १९ क्लासना प्रशासनाने सील लावले आहे. महापौर शैली ओबेरॉय यांनी अधिकाऱ्यांसह क्लासना भेटी दिल्या. राजेंद्रनगरसह अन्य परिसरातील क्लासच्या इमारतींची कागदपत्रे, बाहेर पडण्याचा मार्ग, विद्यार्थ्यांची सुरक्षा या बाबींची पाहणी केली जात असल्याचे ओबेरॉय यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
न्यायालयाने निकाल राखला
तळघरात असलेल्या क्लासमध्ये पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. जुन्या राजेंद्रनगर परिसरात शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेप्रकरणी संबंधित ‘एसयूव्ही’चा चालक मनुज कथुरिया याच्या जामिनावरील निकाल न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. कथुरिया याच्या वाहनामुळे पावसाने साचलेले पाणी तळघरात घुसले. त्यातूनच तिघांचा बळी गेला, असा पोलिसांचा आरोप आहे. ‘कथुरियाने जाणूनबुजून हे कृत्य केलेले नाही. दुर्घटना घडवून आणण्याचा त्याचा हेतू नव्हता, त्यामुळे त्याला जामीन मिळावा,’ अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली. त्याला अतिरिक्त सरकारी वकिल अतुल श्रीवास्तव यांनी आक्षेप घेतला. ‘आपण त्याचे सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहिले आहेत. तो वाहन चालविताना गंमत म्हणून काही गोष्टी करतो. मात्र, या गमतीने मोठा अपघात घडवला आहे,’ असे मत श्रीवास्तव यांनी मांडले.विद्यार्थी आक्रमक
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्ली सरकारच्या जल मंडळाला या प्रकरणी जबाबदार धरण्याची मागणी त्यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना अधिक भरपाई देण्याची मागणीही हे विद्यार्थी करीत आहेत. क्लासजवळ हे विद्यार्थी मूक निदर्शने करीत आहेत.दोषींवर कारवाई करणार : सक्सेना
दिल्ली क्लास दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मंगळवारी दिले.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, घडलेली घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणात हळूहळू अनेक गोष्टी समोर येत आहेत. संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.मानवाधिकार आयोगाची दखल
राजेंद्रनगरमधील दुर्घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली असून, आयोगाने दिल्लीचे मुख्य सचिव, पोलिस आयुक्त आणि दिल्ली महापालिकेच्या आयुक्तांना दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राजधानीमध्ये अशा किती संस्था आहेत, त्यातील नियमभंग करणाऱ्या संस्था किती याची पाहणी करून कारवाई करण्यात यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.अनेक शहरांमध्ये कारवाईचा बडगा
- इंदूरमध्ये इमारतींच्या बेसमेंटमध्ये चालविण्यात येणाऱ्या १३ कोचिंग क्लासेस आणि स्टडी सेंटर सील करण्यात आले.- नोएडामध्ये काही सेंटरवर कारवाई करण्यात आली.- सुरक्षेचे उपाय नसल्यामुळे जयपूरमध्ये दोन कोचिंग सेंटर सील करण्यात आले.- अवैध बांधकामे करण्यात आलेल्या कोचिंग सेंटरवर वाराणसीमध्ये कारवाई करण्यात आली.- पाटण्यामध्ये पोलिसांनी कोचिंग सेंटरमधील सुरक्षेच्या उपायांची पाहणी केली.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/qCOE15m
No comments:
Post a Comment