Breaking

Saturday, July 6, 2024

Nandurbar News : १०८ विद्यार्थ्यांसाठी फक्त १ शिक्षक, गावकरी संतप्त, घेतला टोकाचा निर्णय; काय घडलं? https://ift.tt/Zl9K4i1

महेश पाटील, नंदुरबार : शहादा तालुक्यातील तऱ्हाडी त.बो. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्षभरात आंतरजिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत तीन शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या शाळेत १०८ विद्यार्थी शिकत असून गेल्या सहा महिन्यापासून फक्त एकच शिक्षकावर पूर्ण भार असून मुख्याध्यापकाचे कामही त्यांनाच देण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ६ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढत जिल्हा परिषदेच्या शाळेला टाळे ठोकले. जोपर्यंत शाळेला शिक्षक देत नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

१०८ विद्यार्थी आणि १ शिक्षक

शहादा तालुक्यातील तऱ्हाडी त.बो. येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत १०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी पूर्वी चार शिक्षक काम करत होते. मात्र वर्षभरात आंतरजिल्हा तसंच जिल्हा अंतर्गत ३ शिक्षकांची बदली करण्यात आली, त्यामुळे या शाळेत एकाच शिक्षकावर पूर्ण भार पडला. तीन शिक्षकांची बदली झाली मात्र त्यांच्या जागेवर नव्या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नाही. परिणामी जानेवारी २०२४ पासून या ठिकाणी एकच शिक्षक कार्यरत आहे. एक ते चार वर्ग आहेत परंतु या एक ते चार वर्गांना आता सध्या एकच शिक्षक अध्यापनाचं कार्य करत आहे आणि त्यांच्याकडेच मुख्याध्यापक पदाचा चार्ज देखील आहे. वेळोवेळी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सरपंच आणि पालक यांनी प्रशासनाला अर्ज करून तसंच प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन शिक्षक मिळण्यासंबंधी विनंती केली. मात्र जिल्हा परिषद शाळा तऱ्हाडी येथे शिक्षक देण्यासंदर्भात कोणतीच कार्यवाही झाली नाही.

शाळेला गावकऱ्यांनी ठोकले टाळे

जिल्हा परिषदेच्या शाळेत १०८ विद्यार्थ्यांना गेल्या सहा महिन्यापासून एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणाऱ्या विपरीत परिणामांची पालकांनी दाखल घेत आज ६ जुलै २०२४ रोजी सर्व पालकांनी तसंच ग्रामस्थांनी तसंच राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष छोटू कुवर यांनी मिळून शिक्षक, विद्यार्थी यांना शाळेबाहेर काढत शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत या शाळेला शिक्षक दिला जात नाही, तोपर्यंत या शाळेतील एका शिक्षकावर चालणारे काम आम्ही होऊ देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थ - पालक यांनी घेतला. दरम्यान, एकीकडे जवळच्या १३ ते १५ पटसंख्या असणाऱ्या शाळेत २ शिक्षक आणि १०८ पटसंख्या असणाऱ्या शाळेत एकच शिक्षक ही विसंगती लवकर दूर होईल अशी अपेक्षा सर्व उपस्थितांनी व्यक्त केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/FzybEsV

No comments:

Post a Comment