Breaking

Saturday, August 10, 2024

नागपुरात चुरस! सहा जागांसाठी ७३ दावेदार; सर्वाधिक इच्छुक अडीच डझन दावेदार या मतदारसंघातून https://ift.tt/Eb2Yxzy

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या पश्चिम नागपूरसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात काँग्रेसच्या बऱ्याच इच्छुकांनी दावा केला आहे. सर्वाधिक अडीच डझन दावेदार मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात आहेत. एकूण ७३ इच्छुकांनी अर्ज घेतले असले तरी, बरेच नेते आणि प्रबळ दावेदारांनी या प्रक्रियेला बगल दिली. प्रदेशाध्यक्ष यांनी यांच्या सूचनेवरून राज्यभरातील २८८ जागांवरही इच्छुकांकडून अर्ज मागवले. महिनाभरापासून ही प्रक्रिया चालली. खुल्या वर्गासाठी २० हजार रुपये पक्ष निधी आणि अर्ज प्रदेश काँग्रेसने स्वीकारले. राखीव मतदारसंघ आणि महिला उमेदवारांसाठी दहा हजार रुपये पक्ष निधी होता. शनिवारी अखेरचा दिवस होता. पश्चिम नागपूर मतदारसंघातून विद्यमान आमदार विकास ठाकरे यांनी मात्र अर्ज भरलेला आहे. या मतदारसंघात विनीत चौरसिया, कमलेश चौधरी, पिंकी सिंग, पंकज शुक्ला, सय्यद अहमद यांनीही दावा केला. दक्षिण पश्चिममधून प्रफुल्ल गुडधे यांनी जोरदार तयारी सुरू केली. मतदार नोंदणीची संधी साधून त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावले. अद्याप त्यांनी अर्ज खरेदी केलेला नाही. या मतदारसंघात किशोर उमाठे, मनोज साबळे, रेखा बाराहाते आदी इच्छुक आहेत. दक्षिणमधून राष्ट्रीय सचिव नितीन कुंभलकर यांनी दावा केला आहे. गेल्यावेळी निसटता पराभव झालेले गिरीश पांडव यांचा अद्याप अर्ज नाही. गेल्यावेळी भाजपमधून बंडखोरी केलेले सतीश होले यांनी उमेदवारी मागितली आहे. संजय महाकाळकर यांनी दक्षिण आणि पूर्व अशा दोन मतदारसंघात दावा केला आहे. पूर्वमधून गेल्यावेळी लढलेले पुरुषोत्तम हजारे, प्रदेश सरचिटणीस उमाकांत अग्निहोत्री, तानाजी वनवे, प्रा. हरिश खंडाईत, संगीता तलमले, गणेश शाहू, अतुल सेनाड असे १५ हून अधिक इच्छुक आहेत. मध्य नागपुरात सर्वाधिक अडीच डझन दावेदार आहेत. सामाजिक समीकरणाचा आधार घेत इच्छुक सरसावले. प्रदेश सरचिटणीस व व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष अतुल कोटेचा, शहर सरचिटणीस रमण पैगवार, रमेश पुणेकर, ॲड. आसिफ कुरेशी, मनोज साबळे, शेख हुसेन, मोहनीश जबलापूरे, उषा खरबीकर, शादाब खान नायडू, तनवीर अहमद, प्रज्ञा बडवाईक, जुल्फेकार भुट्टो दावेदार आहेत. उत्तर नागपुरात विद्यमान आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या विरोधात इच्छुक सरसावले आहेत. संदीप सहारे, विवेक निकोसे यांच्यासह सुमारे पाऊण डझन इच्छुक अर्ज घेतले. नागपुरात शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस गजराज हटेवार, रमण पैगवार, महेश श्रीवास यांनी निवडणूक अर्ज प्रक्रिया राबवली. यात नारायण नाखले यांनी सहकार्य केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/BgX0Cle

No comments:

Post a Comment