म. टा. प्रतिनिधी, पुणे जून आणि जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील चार हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे एक हजार ११६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी दोन कोटी १५ लाख रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव पुणे जिल्हा प्रशासन राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. आता ऑगस्ट महिन्यातील नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यात जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरूर, इंदापूर आणि बारामती या तीन तालुक्यांतील पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे एकूण १०० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यात ३४ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जून महिन्यासाठी ११ लाख १८ हजार ६७० रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शहरात पूरग्रस्तांचे नुकसान झाले. त्याशिवाय जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये फळबागांसह पिकांचे नुकसान झाले. त्यात भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, हवेली, दौंड, खेड या सात तालुक्यांचा समावेश आहे. मुळशी आणि खेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. खेड तालुक्यात १०११, तर मुळशी तालुक्यात सर्वाधिक ११२९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जुलै महिन्यासाठी दोन कोटी चार लाख एक हजार २७९ रुपयांच्या नुकसान भरपाईच्या मागणीचा प्रस्ताव आहे, अशी माहिती पुणे जिल्हा प्रशासनाने दिली. जून आणि जुलै महिन्यात मिळून जिल्ह्यात चार हजार ४८ शेतकऱ्यांचे १११६.८१ हेक्टर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन कोटी १५ लाख १९ हजार ९४९ रुपयांच्या नुकसान भरपाईच्या मागणीचा प्रस्ताव सरकारला येत्या दोन दिवसांत पाठविण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. राज्यातील अनेक जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनांची नोंद झाली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/mBD2Wv5
No comments:
Post a Comment