Breaking

Sunday, August 18, 2024

'लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी', महाविकास आघाडीकडे दोनच योजना, फडणवीस यांची टीका https://ift.tt/UQRI58L

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीतील पक्षांकडे लाडकी बहिण योजना हे ब्रीद वाक्य नाही. त्यांच्याकडे लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी हेच ब्रीद वाक्य आहे. मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा, पंतप्रधान झाला तर माझा मुलगा, मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी, अशा दोनच योजना महाविकास आघाडीकडे आहेत, असा जोरदार टोला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत लगाविला. तर राज्यातील सर्व महिला या आमच्या भगिनी आहेत, मात्र त्यांच्याकरिता त्यांची मुले एवढचा त्यांचा संसार असल्याची टीकाही फडणवीस यांनी विरोधकांवर केली. महायुतीचे सरकार असेपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नसल्याचा पुनरुचारही फडणवीस यांनी यावेळी केला.मुंबई भाजपच्यावतीने रविवारी मुंबईत 'लाडक्या बहिणींचा देवाभाऊ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वरील टीका केली. यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुरजी पटेल यांच्यासह मुंबईतील सर्व आमदार आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यांच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांन देवेंद्र फडणवीस यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला.

सावत्र भावांवर विश्वास ठेऊ नका, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा फडणवीस यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधक म्हणतात की १५०० रूपयांची लाच देता का, खरेदी करता का? पण, त्या नालायकांना सांगायला हवे की कोणी १५ कोटी देऊनही बहिणींचे प्रेम खरेदी करु शकत नाही. विरोधकांकडून या योजनेला रोज शिव्याशाप दिल्या जातात. योजना रोखण्यासाठी ते कोर्टातही गेले. त्यानंतर योजना बंद होईल अशी आवई उठवली. या सावत्र भावांवर विश्वास ठेऊ नका. बंद होणार नाही, असे त्यांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तर अर्थसंकल्पाच्या नियमामुळे फक्त एक वर्षाचा निधी ठेवता येतो. तसे नसते तर पुढच्या पाच वर्षांसाठीचा निधी वेगळा काढून ठेवला असता, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

त्यांना ओवाळणीची किंमत कळणार नाही

तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना या ओवाळणीची किंमत कळणार नाही. आपल्या कष्टाने कुटुंब चालविणाऱ्या भगिनींना विचारा- या पंधराशे रूपयांच्या ओवाळणीने काय काय होते ते. तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही तर काहीच दिले नाही. आम्ही द्यायला लागलो तर नाव ठेवायला लागले, असा टोला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगाविला. तर लाडक्या बहिणीसोबत महायुती सरकारने मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले आहे. लेक लाडकी योजना आणली, तीन सिलेंडर मोफत, लखपती दीदी या योजना आणल्या. एसटीत ५० टक्के सवलतीचा निर्णय केला तेव्हा लोक म्हणायचे की आधीच एसटी अडचणीत आहे. पण, महिला वर्गाची ताकद बघा अर्धे तिकिट देऊनही त्यांनी केलेल्या प्रवासाने तोट्यातली एसटी फायद्यात आली, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

विधानसभेत १०० महिला प्रतिनिधी निवडून जाणार

विकासित भारत घडवायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासित मातृशक्ती विकसित महिला अशा प्रकारचे महिलाकेंद्रित धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे २०२७ नंतर जितक्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीत महिला प्रतिनिधींना स्थान दिले जाणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत १०० महिला प्रतिनिधी निवडून जाणार असून त्याअधिक महिला प्रतिनिधी लोकसभेत निवडून जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दहा तोंडाने ते रोज खोटे बोलतात

राज्यातील महायुतीचे सरकार तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत करते आहे. आम्ही योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणीही केल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. विरोधकांसारखे आम्ही केवळ बोलबच्चन देत नाही. त्यांची रोजची भाषणे म्हणजे फक्त बोलबच्चन आहे. त्यांना देणे माहीत नाही, ते फक्त लेना बँक आहेत. वसुलीबाज आहेत. तुमच्या खिशातले पैसेही ओरबाडतात. यांची रावणासारखी दहा तोंड आहे. त्या दहा तोंडाने ते रोज खोटे बोलत राहतात, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/VQviX7A

No comments:

Post a Comment