बदलापूर, प्रदीप भणगे : बदलापूरच्या चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणात आता तपासाला गती मिळाली आहे. आज दिवसभर एसआयटीची टीम बदलापूरच्या आदर्श शाळेत तळ ठोकून होते. यावेळी आरोपीच्या पालकांचा जबाब देखील नोंदवण्यात आला आहे. तर एसआयटीची एक टीम आरोपीच्या घरी जाऊन तपास करीत होती. बदलापूर चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणात राज्य शासनाने एसआयटी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम नेमली असून या एसआयटीच्या अंतर्गत गुन्हचा तपास सुरू करण्यात आला आहे. एसआयटीच्या प्रमुख आरती सिंह यांनी आज शाळेत तपासाच्या अनुषंगाने अनेकांचे जबाब नोंदविले त्यात आरोपीचे आई-वडिलांचा ही समावेश आहे. सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान एसआयटीची टीम आरोपी यांच्या घरी तपासासाठी गेली होती. दरम्यान आज दिवसभर झालेल्या तपासाची कोणतीही माहिती समोर आली नाही. एवढेच नव्हे तर स्थानिक पोलीस प्रशासनाला देखील कोणतेही माहिती पुरवण्यात आली नाही. या प्रकरणाच्या तपासातील अनेक मुद्दे गोपनीय ठेवण्यात येत आहेत. शिशुवर्गातील विद्यार्थिनी अत्याचारप्रकरणी एसआयटीच्या चोकशीत ठपका ठेवल्यानंतर अखेर शाळा व्यवस्थापनाविरोधातही पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिवांसमोर चौकशीसाठी उपस्थित असलेल्या शाळा व्यवस्थापनाचे संचालक आणि इतर सदस्यांनी चौकशीला सामोरे न जाता पळ काढल्याने चौकशी अधिकाऱ्यांकडून संचालक आणि इतर मंडळींचा शोध सुरू होता. या शाळेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. तसेच राज्य सरकारकडून नियुक्त केलेल्या एसआयटीने केलेल्या चोकशीअंती शाळा व्यवस्थापनावर ठपका ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी शाळा व्यवस्थापनावरही पोक्सो कायद्यांतर्गत बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिव रुपाली बॅनर्जी यांनी शुक्रवारी या प्रकरणाशी संबंधित सर्व शासकीय विभाग, शाळेच्या निलंबित मुख्यध्यापिका, शाळा व्यवस्थापन यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र या चौकशीला सामोरे न जाता शाळेचे संचालक तसेच व्यवस्थापनातील मंडळींनी पळ काढला. त्यानंतर चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांकडून विचारणा होत असताना शाळा व्यवस्थापनाची एकही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याने त्यांचा शोध घेण्यात येत होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/nWvhplU
No comments:
Post a Comment