नांदेड (अर्जुन राठोड) : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खासदार यांचे निकटवर्तीय असलेल्या एका व्यावसायिकाचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी अडीच लाख रुपये रोख रक्कमेसह सोन्या चांदीचे दागिने आणि विदेशातील मौल्यवान वस्तूवर डल्ला मारला. मंगळवारी (१० सप्टेंबर) सकाळी चोरीची घटना उघडकीस आली. अब्दुल सलाम चावलवाला यांच्या घरी ही चोरीची घटना घडली आहे. विशेष म्हणजे चोरी दरम्यान चोरट्यांनी फ्रीज मधील दुबई येथील खजूरचा आस्वाद देखील घेतल्याची माहिती आहे. अब्दुल सलाम चावलवाला यांचं देगलूर नाका हैदर बाग येथे निवासस्थान आहे. चावलवाला हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मित्र आहेत. शिवाय ते काँग्रेसमध्ये सक्रिय देखील आहेत. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली तरी, चावलवाला काँग्रेस पक्षात राहिले. त्यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. ६ सप्टेंबर रोजी ते घराला कुलूप लावून आपल्या कुटुंबियांसह मुंबईला गेले होते. घराला कुलूप असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील कपाटामध्ये असलेले रोख अडीच लाख रुपये, सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. शिवाय राडो या विदेशी कंपनीचे घड्याळ देखील चोरट्यांनी पळविली. लाखो किंमतीचे असलेले तीन घड्याळ चोरीला गेल्याच समजते. चोरी दरम्यान चोरट्यांनी फ्रिज मध्ये ठेवलेल्या विदेशी खजुरा आस्वाद देखील घेतला. फ्रिजमध्ये ठेवलेले दूध देखील पिले. चावलवाला हे आज सकाळी कुटुंबियांसह घरी परत आले, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात गेल्यानंतर साहित्य अस्ताव्यस्त आढळून आले. चोरटे हे जवळपास १० ते १२ तास घरात होते असा अंदाज घर मालकाकडून व्यक्त केला जात आहे. घरात चोरी झाल्याच समजताच त्यांनी तात्काळ इतवारा पोलीसांना माहिती दिली. इतवारा पोलिसांचे डीवायएसपी सुशील नाईक, पोलिस निरीक्षक रंजीत भुईते यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने शोध घेतला, मात्र चोरट्यांचा काहीच सुगावा लागला नाही. दरम्यान पोलिसाकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येतं आहे. चोरीच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/cN1uqOx
No comments:
Post a Comment