Breaking

Thursday, September 19, 2024

महाराष्ट्राने घडवल्यामुळेच हरियाणाची ऑफर नाकारली, रौप्यपदक विजेता सचिन खिलारीचा मराठी बाणा https://ift.tt/n0EjIVy

गोपाळ गुरव : मला गेल्या वर्षापासून हरियाणाकडून खेळण्याचे प्रस्ताव येत आहेत. मात्र, महाराष्ट्रात घडलो असल्याने हरियाणाची चांगल्या पैशांची ऑफर नाकारली,’ अशी माहिती पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकमध्ये जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या सचिन खिलारीने दिली. सचिनला अद्याप पॅरा-आशियाई आणि पॅरा-जागतिक स्पर्धेत पदक मिळाल्यानंतरची राज्य सरकारची बक्षीस रक्कम मिळालेली नाही.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमानंतर सचिनने ‘मटा’शी संवाद साधला. या वेळी तो म्हणाला, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर मला यश मिळाल्यानंतर हरियाणाकडून मला ऑफर यायला सुरुवात झाली. त्या लोकांनी मला सांगितले, की आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळाल्यानंतर सरकारकडून मिळणाऱ्या मदतीतून केवळ दहा टक्के रक्कम त्यांना द्यायची. त्या आधीचा माझ्यावरील सर्व खर्च हरियाणातील संघटना करणार होती. हरियाणा सरकारकडून सुवर्णपदक विजेत्यास सहा कोटी रुपयांचे पारितोषिक मिळते. मात्र, मी तो प्रस्ताव नाकारला. आपल्या राज्यातूनच खेळण्यास प्राधान्य दिले.’ सचिन सांगली तालुक्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावाचा. गँगरिन झाल्यामुळे अकरा वर्षांचा असताना त्याला एका हाताला अपंगत्व आले. यानंतर तो भालाफेक, व्हॉलिबॉल खेळत होता. त्याने २०२२च्या हाँग्वझू आशियाई पॅरा-क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. यानंतर २०२३ आणि २०२४च्या जागतिक पॅरा-अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. राज्यसरकारकडून या तिन्ही स्पर्धांचे मिळून त्याला नऊ लाख रुपये येणे अपेक्षित आहे. मात्र, त्याला अद्याप हे पैसे मिळालेले नाहीत. याबाबत सचिन म्हणाला की, ‘आशियाई पॅरा-क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याने मला तीन लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, ही रक्कम वाढवून मिळण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. राज्याकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. आशा आहे, पॅरिसमधील यशाने पैसे लवकर मिळतील. त्याचबरोबर पॅरिस पॅरालिम्पिकच्या तयारीसाठी राज्य सरकारकडून पुरेसे पैसे मिळाल्याचे आणि पॅरिसमधून दिल्लीत दाखल झाल्यावर केंद्राकडून लगेच धनादेश मिळाल्याचे त्याने आवर्जून सांगितले. राज्य शासनाने थेट नियुक्ती योजनेअंर्तगत क्लास वनची पोस्ट दिल्याने ते स्वप्नही पूर्ण झाल्याचे त्यान नमूद केले.

सुविधा द्या; पदक आणतो

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये चीनचे खेळाडू खोऱ्याने पदके मिळवतात याबाबत विचारले असता, तो म्हणाला, ‘चीन, अमेरिका, ब्रिटन हे देश आपल्याकडे सुविधांच्या बाबतीत कितीतरी पुढे आहेत. आपल्याकडे देशभरात एक हजार स्टेडियम असतील, तर त्यात सर्वाधिक क्रिकेटची असतील. चीनमध्ये हजारो मल्टीस्टेडियम आहेत. आपल्याकडे गुणवान खेळाडूंची कमतरता नाही. गावागावात सुविधा निर्माण केल्यात, तर हजारो सचिन खिलारी तयार होतील. सुविधा द्या. तुम्हाला पदके मिळतील.’


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/voj6E7G

No comments:

Post a Comment