नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकनंतर निवृत्त झालेला भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याला एफआयएचच्या वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षकाच्या पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे. या निमित्ताने शुक्रवारी व्य़क्त केलेल्या प्रतिक्रियेतून त्याने पुन्हा एकदा आपल्या नि:स्वार्थी स्वभावाचे दर्शन घडवले. 'मी रोखलेला प्रत्येक गोल हा भारतीय संघ आणि देशासाठीच होता', असे तो म्हणाला. हॉकी इंडियाच्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे त्याने ही प्रतिक्रिया व्यक्त केली.श्रीजेशने आपल्या १८ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत छातीचा कोट करत प्रतिस्पर्ध्यांची अनेक 'गोल आक्रमणे' परतवून लावली आहेत. अलीकडेच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने राखलेल्या ब्राँझपदकातही त्याचा वाटा मोलाचा होता.'या पुरस्कारासाठी नामांकन मिळणे हे भारतीय संघाची एकजूट आणि अविश्वसनीय कामगिरीचे प्रतीक आहे. माझी कामगिरी भावी पिढीला प्रोत्साहन देईल. युवापिढीला हॉकीत येण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा वाटते', असे 'भारतीय हॉकी संघाची महान भिंत', असे टोपण नाव लाभलेला श्रीजेश म्हणाला.पॅरिस ऑलिम्पिक ही कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असेल असे त्याने आधीच जाहीर केले होते. अखेरची स्पर्धा असूनही त्याचा उत्साह आणि कौशल्य तरूण हॉकीपटूला लाजवेल असे होते.'हे नामांकन म्हणजे आमच्या कामगिरीचे कौतुक आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी प्रवासाची यशस्वी सांगता आणि त्यापाठोपाठ हे नामांकन विशेष वाटते. पॅरिस ऑलिम्पिक म्हणजे भावनिक आणि संस्मरणीय अनुभव ठरला. अन् आता हे नामांकन म्हणजे आमच्या कठोर परिश्रमाचे फलित आहे. हे फक्त माझे नामांकन नसून मला खंबीर पाठिंबा देण्याऱ्या प्रत्येकाचे आहे', असे केरळचा हा प्रेमळ स्वभावाचा हॉकीपटू सांगतो.
पॅरिस ऑलिम्पिकमधील चमक
पॅरिसमधील श्रीजेशची प्रत्येक सामन्यातील कामगिरी लक्षवेधक ठरली. त्यातही ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यातील त्याची कामगिरी दर्दी हॉकीप्रेमींच्या लक्षात राहिल. अमित रोहिदासला 'रेड कार्ड' मिळाल्याने संघ दहा खेळाडूंचा झाला होता. त्यानंतरच्या पेनल्टी शूटआऊटमध्ये श्रीजेशने ब्रिटनचे प्रयत्न उधळून लावत भारताला ४-२ असा विजय मिळवून दिला. सातत्यपूर्ण कामगिरी करत श्रीजेश आंतरराष्ट्रीय हॉकीतील सर्वोत्तम गोलरक्षकांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.याआधीचे पुरस्कार
-२०२१ आणि २०२२मध्ये एफआयएचचा सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार-ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचा मानकरी-अर्जुन पुरस्काराने गौरव-'वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ दी इयर' पुरस्काराने सन्मानfrom Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/1WGyXwO
No comments:
Post a Comment