Breaking

Monday, October 7, 2024

पाकिस्तानमध्ये भारत खेळणार, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाबत समोर आली मोठी बातमी https://ift.tt/FyA19So

संजय घारपुरे : ‘चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धा नव्या वर्षात पाकिस्तानात होईल आणि त्यात भारताच्या संघाचाही सहभाग असेल,’ असा विश्वास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी सोमवारी व्यक्त केला. भारताचा क्रिकेट संघ २००८च्या जुलैपासून पाकिस्तानात खेळलेला नाही. त्यामुळे ही स्पर्धा अन्यत्र होईल, अशी चर्चा सुरू आहे.चॅम्पियन्स करंडक स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्चदरम्यान अपेक्षित आहे. या स्पर्धेतील लढती लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे होणार आहेत. गतवर्षी आशिया कप स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. त्या वेळी या स्पर्धेतील आपल्या लढती श्रीलंकेत घेण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशियाई क्रिकेट परिषदेस भाग पाडले होते. त्या वेळी जय शहा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष होते. आता पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स स्पर्धा होणार असताना जय शहा आयसीसीचे अध्यक्ष असतील. ‘चॅम्पियन्स स्पर्धेची पूर्वतयारी ठरल्यानुसार सुरू आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ ठरल्यानुसार येतील. भारताचा संघही या स्पर्धेत खेळणार आहे,’ असे नक्वी यांनी सांगितले. ‘भारतीय संघ नक्कीच स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये येईल. त्यांनी या स्पर्धेत न खेळण्याबाबत काहीही सांगितलेले नाही किंवा याबाबतचा निर्णय घेण्यास जास्त कालावधीही मागून घेतलेला नाही. चॅम्पियन्स स्पर्धेसाठी सर्व ठरल्यानुसार पाकिस्तानात येतील, असा आम्हाला विश्वास आहे,’ असे नक्वी यांनी सांगितले. पाकिस्तानने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या निमित्ताने स्टेडियमचे नूतनीकरण सुरू केले आहे. ही नूतनीकरण प्रक्रिया लांबल्यामुळे स्पर्धा लांबणीवर पडू शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, नक्वी यांनी त्यात तथ्य नसल्याचे सांगितले. ‘चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सामन्यासाठी स्टेडियम नक्कीच सज्ज होतील. काही काम अपूर्ण असल्यास ते स्पर्धेची सांगता झाल्यावर पूर्ण होईल. ही स्पर्धा नव्या स्टेडियमवर होणार हे नक्की आहे,’ असे त्यांनी ठामपणे सांगितले.

जयशंकर-नक्वी चर्चा?

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे १५ आणि १६ ऑक्टोबरला शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेसाठी पाकिस्तानात येणार आहेत. त्या वेळी नक्वी हे जयशंकर यांच्याशी चॅम्पियन्स स्पर्धेतील भारताच्या सहभागाबाबत चर्चा करतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ‘जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्याचा अंतिम कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही,’ एवढेच नक्वी यांनी सांगितले. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारताच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले. त्यामुळे बीसीसीआय ही भारत सरकारच्या निर्णयाविना पाकिस्तानमध्ये जाऊ शकत नाही, हे स्पष्ट आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/MUqe0C5

No comments:

Post a Comment