मुंबई: महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपावर दिल्लीतील बैठकीत जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या जागांबाबत मुंबईत एक बैठक घेऊन येत्या दोन दिवसांत तोडगा काढला जाणार आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले. त्यानुसार, भाजप किमान १५५ ते १६५, एकनाथ शिंदे यांची शिवसेना किमान ७० ते ७५ आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस किमान ४० ते ४५ जागा लढवणार असल्याचे समजते. भाजपची ६५ ते ७० उमेदवारांची पहिली यादी आज, रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील अमित शहा यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत महायुतीतील छोट्या पक्षांनाही काही जागा देण्याचे मान्य करण्यात आले. ‘लोकसभेनंतर आम्ही राज्यात जागानिहाय सर्वेक्षण केले आहे व त्यानुसारच कोणाला किती व कोणत्या जागा द्यायच्या याचे सूत्र ठरवले आहे. पाच-सात जागांवर बदल होऊ शकतात,’ असे शहा यांनी स्पष्ट केल्याचे समजते. ज्यांचे जास्त आमदार त्यांना जास्त जागा हे ढोबळ सूत्र कायम राहील. घटक पक्षांनी कोणाला तिकिटे द्यायची हा त्यांचा अधिकार आहे, पण काही आमदारांबाबत आम्ही आमचा अभिप्राय देऊ, त्याचाही विचार करा; तसेच जागावाटपाबाबत प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत प्रसारमाध्यमांना फारशी माहिती देण्याचे टाळा, अशी सूचना या बैठकीत मान्य करण्यात आल्याचे कळते. राज्यात महायुतीची पुन्हा सत्ता येण्यासाठी काही तडजोडी सर्वांनाच कराव्या लागतील हे पंतप्रधानांचे मत तुमच्या कानावर घालतो आहे, असेही शहा यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. काही जागा बदलायच्या असतील तर तशीही मानसिकता ठेवावी, असेही शहा यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीनंतर फडणवीस आणि पवार त्वरित राज्यात परतले, तर मुख्यमंत्री शिंदे शनिवारी संध्याकाळी मुंबईला रवाना झाले. मुंबईतील जागावाटप निश्चितराज्यात महायुतीमधील घटक पक्ष किती जागा लढविणार हे दोन दिवसांत निश्चित होणार असले, तरी मुंबईतील जागावाटप मात्र निश्चित झाले आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी भाजप १८ जागा लढविणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना १६ जागा आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस वांद्रे पूर्व आणि अणुशक्तीनगर या दोन जागा लढविणार असल्याचे निश्चित झाल्याचे खात्रीलायकरित्या समजते. अणुशक्तीनगर येथे नवाब मलिक हे ‘राष्ट्रवादी’चे विद्यमान आमदार आहेत, तर वांद्रे पूर्वमधील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी हे ‘राष्ट्रवादी’तून आगामी निवडणूक लढविणार आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईत ज्या जागा लढवल्या होत्या, त्यातील जवळपास सर्वच्या सर्व जागा शिंदे यांची शिवसेना लढविणार आहे. दरम्यान, सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असताना मुंबईत भाजपने १६, तर शिवसेनेने १४ जागा जिंकल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला आपल्या कोट्यातून अन्य घटक पक्षांना जागा द्यायच्या आहेत. कोणत्याही पक्षाकडे विजयी उमेदवार नसल्यास पाच ठिकाणी अधिक-उणे केले जाऊ शकते.दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीत फडणवीस यांच्यासह प्रामुख्याने विद्यमान आमदारांचा समावेश असेल. लोकसभेचा पूर्वानुभव ताजा असल्याने विधानसभेला फार मोठ्या प्रमाणावर तिकिटे कापण्याच्या मनस्थितीत भाजपचे पक्षश्रेष्ठी नाहीत. ‘३०-३५ जागांचा निर्णयही लवकरच’नवी दिल्ली : ‘जागावाटपाबाबत गरज पडली तर अमित शहा यांच्याशी आम्ही पुन्हा चर्चा करू. आता तिढा राहिलेला नाही. ३०-३५ जागांवरील निर्णय बाकी असून, त्याचाही लवकरच अंतिम निर्णय होईल. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असून आम्ही आता फक्त जिंकण्यासाठी काम करीत आहोत,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘आमच्याकडे मुख्यमंत्रिपदावरून वाद होत नसतात,’ असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. ‘ठाकरे व मविआचीही प्रकृती व्यवस्थित’मुंबई : महाविकास आघाडीतील दोन प्रमुख नेत्यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नितला यांनी शनिवारी शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी चेन्नितला म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी ‘मातोश्री’वर गेलो होतो. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून, महाविकास आघाडीची प्रकृतीही व्यवस्थित आहे. आम्ही एकत्र आहोत.’ त्यामुळे मविआतील मतभेदांच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/JDAhWj9
No comments:
Post a Comment