म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : हरियाणाच्या मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खोटा प्रचार करणाऱ्यांना नाकारले आहे. हरियाणातील लोकांनी खोट्या कथनाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे हरियाणात जे घडले तेच नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात घडेल, असा दावा भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केला. हरियाणा विधानसभेचा निकाल हा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा आणि मुर्खाच्या नंदवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा असल्याचेही त्यांनी सांगितले.हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने संपादन केलेल्या नेत्रदीपक विजयाचा जल्लोष मंगळवारी प्रदेश भाजपने केला. त्यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी फडणवीस यांनी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होईल. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचाराचा भाजपला फटका बसला. अशा खोट्या प्रचाराला तशाच थेट पद्धतीने उत्तर देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. लोकसभा निवडणुकीनंतर पहिली परीक्षा हरियाणा, जम्मू-काश्मीरमध्ये होती. या परीक्षेत मतदारांनी विरोधकांच्या खोट्या प्रचाराला स्पष्टपणे नाकारून नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या कार्यक्रमाला साथ दिली आहे. हरियाणामध्ये अग्निवीर योजनेविरोधात अपप्रचार झाला. वेगवेगळया समाज घटकांत फूट पाडण्याचे कारस्थान रचले गेले. मतदारांनी हा खोटा प्रचार नाकारत मागील निवडणुकीपेक्षा भाजपला मोठे यश मिळवून दिले. विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना हरियाणाच्या मतदारांनी पहिली सलामी दिली असून दुसरी सलामी महाराष्ट्रात मिळेल, असे फडणवीस म्हणाले. नागरिकांची फसवणूक करून निवडून आलेल्यांना लोक त्यांची जागा दाखवून देतात. या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ म्हणजे देशातील लोक आजही केवळ नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहेत. राहुल गांधी यांच्या नाटक आणि नौटंकीला कुणीही भुलणार नाही हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे, असे फडणवीस म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये भारताचा, लोकशाहीचा विजय झाला आहे. ३७०वे कलम रद्द झाल्यानंतर तेथे रक्ताचे पाट वाहतील असे म्हणणाऱ्यांना तेथील मतदारांनी उत्तर दिले आहे. काश्मीरच्या नागरिकांवर भारतात अन्याय होतो आहे, असा प्रचार आंतरराष्ट्रीय पातळीवर करणाऱ्या पाकिस्तानला काश्मिरी जनतेने चपराक लगावली आहे, असेही फडणवीस म्हणाले.
संजय राऊत यांना टोला
हरियाणात काँग्रेस विजयी होणार या खात्रीने महाराष्ट्रातील महविकास आघाडीच्या नेत्यांनी आज काय बोलायचे याचे स्क्रीप्ट तयार करून ठेवले होते. सकाळी नऊ वाजताच्या भोंग्याने रात्रीच तयारी करून ठेवली होती. आता मला विचारायचे आहे की, आता कसे वाटतेय असे म्हणत फडणवीस यांनी शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला. दरम्यान, हरियाणामध्ये भाजपने ऐतिहासिक यश मिळवले असून महाराष्ट्रात या विजयाची पुनरावृत्ती होईल, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/v34Uyk7
No comments:
Post a Comment