Breaking

Friday, October 11, 2024

निवडणुकीच्या तोंडावर उदय सामंतांचे मोठे वक्तव्य, मला कोणीही कितीही शिव्या घातल्या तरी… https://ift.tt/yEub4TM

प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी येथे १९ हजार ५५० कोटींच्या वेल्लोर कंपनीच्या सेमिकंडक्टर बनवणाऱ्या प्रकल्पाच भूमिपूजन उद्योगमंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते शुक्रवारी रत्नागिरी एमआयडीसी येथे करण्यात आले. लवकरच धीरुभाई अंबानी यांच्या कंपनीचा डिफेन्स क्लस्टरचा मोठा प्रकल्प येथे येणार आहे, अशी घोषणा सामंत यांनी केली. या मोठ्या प्रकल्पांचे आपण स्वागत करायला हवं, या प्रकल्पामधून हजारोंनी रोजगार निर्मिती होणार आहे. आपल्या मुलांना येथेच या मोठ्या प्रदूषण विरहित प्रकल्पात रोजगार मिळणार आहे, असे या कार्यक्रमावेळी त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांवर रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना भाजपा युतीबद्दल त्यांनी मत व्यक्त केले असून कोणतेही वाद नसल्याचे सांगितले आहे. रत्नागिरी येथे युतीमध्ये कोणतेही वाद नाही, मात्र ज्या ठिकाणी वाद काही असतील ते महायुतीचे सरकार आणण्यासाठी मिटतील अशी सूचक प्रतिक्रियाही शिवसेना नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मतदार संघ

दापोली येथे शुक्रवारी शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी कुणबी समाजभवनासाठी दिलेल्या जागेच भूमिपूजन करण्यात आलं. तर याचवेळी दुसरीकडे दापोली येथेच भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या जागेवरही कुणबी समाज भवनाचे उद्घाटन झाले. रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या कुणबी भवनाच्या जागेचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी दापोली येथील ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या उपस्थितीत होते. या दोन्ही कार्यक्रमांची चर्चा सध्या जोरात सुरू असून यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मतदार संघातील महायुतीमधील नेते या दोन्ही कार्यक्रमाचे आयोजक नसतानाही जिल्ह्यातील शिवसेना भाजपा युतीमधील संघर्ष अप्रत्यक्षपणे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने समोर आला आहे.

वाद असतील तर ते महायुतीसाठी मिटतील...

याबद्दल विचारलेला प्रश्नावर सामंत म्हणाले की, दापोली येथे कुणबी समाजाला दोन दोन कुणबी समाजभवन मिळाली हे चांगलं झालं. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात युतीमधील वादाबाबत विचारले असता, ते म्हणाले की शिवसेना भाजप युतीमध्ये कोणतेही वाद नसून भाजपाचे माजी आमदार बाळ माने हे माझे गेली २५ वर्ष जुने सहकारी मित्र आहेत, मी त्यांच्याबद्दल कधीही वाईट बोललो नाही आणि मला कोणीही कितीही शिव्या घातल्या तरी त्या माझ्यासाठी ओव्या आहेत, अशी मोठी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे. महायुतीचे सरकार पुन्हा आणायचं आहे, त्यामुळे जे काही वाद आहेत ते मिटतील असेही वक्तव्य उदय सामंत यांनी केले आहे.

कोणीही शिव्या दिल्या तरी त्या माझ्यासाठी ओव्या...

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २००४ साली आपण पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आमदार झालो, त्यावेळेला शिवसेनेत होते ते आजही ठाकरे गटात आहेत त्यामुळे भाजपा कोणी संपवली हे पाहावं असं सांगत शिवसेनेच्या ठाकरे गटावर उदय सामंत त्यांनी निशाणा साधला आहे. माजी आमदार बाळ माने यांचा माझ्याबद्दल काय गैरसमज आहे मला माहिती नाही, बाळ माने यांनी मला सांगितलेली कामे मी माझी समजून केली आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये वादाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, माझा गेल्या पंचवीस वर्षात कोणा जवळही वाद नाही, वाद कधी होतो, ज्या वेळेला आपण तोंडाला तोंड देतो, त्या वेळेला वाद निर्माण होतो. मात्र मला कोणीही शिव्या दिल्या तरी त्या माझ्यासाठी ओव्या आहेत. आपण आजवर कोणाजवळ कधी वाद केले नाहीत. माझं कोणाशीच वाकडं नाही आणि ज्यांना मला पाडायचा आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दात उदय सामंत यांनी मार्मिक भाषेत टिप्पणी केली आहे. इतकेच नाहीतर याचा निर्णय जनता घेईल, माझे कोणतेही वाद बाळ माने त्यांच्याजवळ नाहीत, महायुतीने जर का भाजपला तिकीट दिले, तर मी प्रचार करीन असेही मोठे वक्तव्य शिवसेनेचे नेते पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

मित्र पक्षातील नेत्यांना नाव न घेता खडेबोल

भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी टीका करत रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र या टीकेनंतर आपण त्यावर बोललो आहोत. अनिकेत पटवर्धन यांची काम करण्याची पद्धत किती योग्य आहे आणि ती महायुतीच्या हिताची आहे, असे सांगत मी भूमिका मांडली आणि आपण जे बोलतो ते उघडपणे सांगतो. याबद्दल दुसरे कोणीही बोलल नाही, असे म्हणत अप्रत्यक्षपणे उदय सामंत यांनी मित्र पक्षात असलेल्या जिल्ह्यातील नेत्यांना नाव न घेता खडेबोल सुनावले आहेत.

जागा वाटपाबाबत काय म्हणाले सामंत?

राज्यात महायुती मधील जागावाटप पंचशील टक्के पूर्ण झाला असून उर्वरित पंधरा टक्के जागा वाटप हे येत्या आठ दिवसात पूर्ण होईल आणि गुहागरच्या जागेबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असेही ते म्हणाले.भाजपाचे युवा नेते निलेश राणे यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश या प्रश्नावर ते म्हणाले, की माजी खासदार निलेश राणे हे महायुतीचे उमेदवार असतील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे सहकार्य करू आणि ते निवडून येतील अशा शब्दात उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/7XT6Y0w

No comments:

Post a Comment