Breaking

Sunday, November 10, 2024

'प्रणिती तुझ्यासाठी लोकसभेवेळी प्रचार केला, आता अपक्षाचं मांजर आडवं...' सोलापुरातून उद्धव ठाकरेंनी टोचले कान https://ift.tt/YQ9okvw

सोलापूर : दक्षिण सोलापूर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी सोलापूरमध्ये हजेरी लावली. जुळे सोलापूर येथील मोठ्या मैदानावर सभा संपन्न झाली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भरसभेत महाविकास आघाडीच्या दोन्ही खासदारांचे कान टोचले. दक्षिण सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय असे चित्र निर्माण झाले आहे. महाविकास आघाडी मधील खासदार प्रणिती शिंदे या शिवसेना गटाच्या उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारासाठी सहभागी झाल्या नाहीत. रविवारी उद्धव ठाकरेंनी सोलापुरातील भरसभेत प्रणिती शिंदेंचे नाव घेऊन लोकसभेची आठवण करून दिली. प्रणिती लोकसभेच्या प्रचारावेळी मी तुझ्यासाठी सोलापुरात आलो होतो. आता तुझं काम आहे महाविकास आघाडीमधील सोलापुरातील उमेदवारांचे प्रचार करणे. अपक्षाचं मांजर आडवं जाऊ देऊ नका, अन्यथा भाजपला फायदा होईल, तुझ्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलीय, आता तू मेहनत घे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सभा गाजवली.

नवाब मलिकांवरून भाजपला टोला

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर येथून निवडणूक लढवत आहेत. एकेकाळी नवाब मलिक माझ्यासोबत मंत्रिमंडळात होते, त्यावेळी भाजपने त्यांना ईडीची चौकशी लावत दाऊद इब्राहिमसोबत संबंध आहे, असा ठपका ठेवून अटक केली होती. महायुतीत असताना भाजपवाले आता नवाब मालिकासोबत व्यासपीठावर जाणार का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

'मुन्ना महाडिक आहे का मुन्ना भाई एमबीबीएस आहेत'

कोल्हापूर येथील खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी महिलांना उद्देशून टिप्पणी केली. काँग्रेसच्या सभेत दिसाल तर १५०० रुपये काढून घेऊ, त्यावर उद्धव ठाकरेंनी कडाडून टीका केली. तुम्ही १५०० रुपये देऊन विकत घेतलाय का? मुन्ना महाडिक हे मुन्ना भाई एमबीबीएस सिनेमामधील मुन्ना भाई आहेत का? असा सवाल देखील त्यांनी केला.

'धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन वाजपेयींनी दिले होते'

उद्धव ठाकरे यांनी रविवारी सोलापूरच्या भाषणात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन इतिहास गिरवला आहे. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाल्यानंतर पंढरपूर येथे मोठी सभा झाली होती. त्यावेळी धनगर समाजाला आरक्षण देणार, असे आश्वासन दिले होते. त्यावर भाजप मूग गिळून गप्प का आहेत? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/x5NgSFq

No comments:

Post a Comment