म. टा. वृत्तसेवा, सटाणा: राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील १७ मोठे उद्योग राज्याबाहेर गेले. त्यामुळे राज्याची अधोगती झाली. म्हणून महाराष्ट्राच्या अधोगतीला कारणीभूत असलेल्या महायुतीचे सरकार हद्दपार करण्याची वेळ येवून ठेपली आहे. राज्याच्या प्रगतीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारास मतदान करून त्यांना निवडून आणण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. बागलाण मतदारसंघातील विधानसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार दीपिका चव्हाण यांच्या प्रचारार्थ ताहाराबाद (ता. बागलाण) येथील जाहीर सभेत पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, की महाराष्ट्रातील फोक्सवॅगनसारखा प्रकल्प राज्याबाहेर नेऊन या सरकारने महाराष्ट्राच्या हाती भोपळा दिला. श्रीमंतांचे चोचले पुरविण्याचे काम या सरकारने केले. राज्यातील आर्थिक विकास दर घसरला असून, सन २०१६ पासून राज्य अधोगतीला जात असल्याचा आरोप करीत महागाईची लक्ष्मणरेषा ओलांडलेल्या या सरकारने महिलांची क्रूर थट्टा चालविली आहे. विधानसभेची निवडणूक ही विचारांची, अपप्रवृत्तीला दूर करण्याची आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा, असे आवाहनही पाटील यांनी केले. तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी जनतेने मला संधी द्यावी, असे आवाहन उमेदवार दीपिका चव्हाण यांनी केले. या प्रसंगी खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार सुधीर तांबे, संजय चव्हाण, प्रा. यशवंत गोसावी उत्तम भोये, यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर माजी जि. प. सभापती यशवंत पाटील, पोपटराव अहिरे, प्रा. अनिल पाटील, केशव मांडवडे, डॉ. प्रशांत सोनवणे, यशवंत अहिरे, प्रल्हाद पाटील, बाळासाहेब सोनवणे, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/kULq4jJ
No comments:
Post a Comment