म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या नीतीचा काँग्रेस वापर करीत आहे. जातीजातींत भांडणे लावत आहे. देव, देश आणि धर्म याबाबत आस्था नसणाऱ्या आणि नीती, निर्णयक्षमता नसणाऱ्या, देशाला धोका देणाऱ्या या पक्षावर विश्वास ठेवू नका,’ असे आवाहन करताना ‘राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला बळ द्या,’ असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.कोल्हापुरात महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी योगींची तपोवन मैदानावर जंगी सभा झाली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. या वेळी खासदार धंनजय महाडिक, धैर्यशील माने यांच्यासह राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, अशोकराव माने या उमेदवारांसह अनेक नेते उपस्थित होते.मुख्यमंत्री योगी म्हणाले, ‘सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे. ते एकमेकांना धोका देत आहेत. यांनी प्रथम हिंदूंना धोका दिला. आता देशाला धोका देत आहेत. देशाला धोका देण्याचा काँग्रेसचा इतिहासच आहे. त्यांच्या या वृत्तीमुळेच पाकिस्तानची निर्मिती झाली. हे सत्य ते मानायला तयार नाहीत. इंग्रजांचेच अंश असलेल्या काँग्रेसने त्यांच्याच ‘फोडा राज्य करा’ या नीतीचा वापर सुरू ठेवला आहे. जात, भाषा, प्रांत यावर आपआपसांत भांडणे लावण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यांच्यामुळेच देशाला प्रत्येक वेळी अपमान सहन करावा लागत आहे.’ मूळ विचारापासून उद्धव ठाकरे दूर गेल्याचा आरोप करताना योगी म्हणाले, ‘हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारला पुन्हा बहुमताने निवडून द्या. म्हणजे गणेशोत्सव, रामनवमी अशा वेळी दगडफेक करणारे घरातून बाहेर पडू शकणार नाहीत.’ या वेळी भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, शौमिका महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, मच्छिंद्र सकटे, पृथ्वीराज महाडिक, उत्तम कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात झालेल्या सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी खासदार धैर्यशील माने, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, समित कदम, अशोकराव माने आदी उपस्थित होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/wQvLmyC
No comments:
Post a Comment