Breaking

Saturday, December 28, 2024

गुगल मॅपने पुन्हा फसवले, चुकीच्या दिशादर्शकाचे शिकार ठरले; गाडी आदळली अन्... https://ift.tt/4EMqtcF

लखनऊ : Google Mapच्या चुकीच्या दिशादर्शकाचा आणखी एक शिकार ठरला आहे. उत्तरप्रदेशमधील हाथरस मध्ये गुगल मॅपमुळे आणखी एक कार दुर्घटनाग्रस्त झाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारमधील प्रवाशांची सुटका केली आहे. पण महामार्गावरील अडथळ्यांच्या गुगल मॅपवरील नोंदीबाबत प्रशासनाने दुरुस्ती करावी, जेणेकरुन अपघातांची मालिका थांबेल, अशी मागणी जोर धरु लागली आहे. वृत्तानुसार, उत्तरप्रदेशच्या हाथरस जंक्शन पोलीस ठाणे हद्दीतील नवनिर्मित अशा महामार्गावर गुगल मॅपच्या चुकीमुळे अपघात झाला. मथुरेहून बरेलीच्या दिशेने जाणाऱ्या कारचालकाला गुगल मॅपने महामार्गावरील स्पष्ट मार्ग दाखवला. त्यानुसार कारचालकाने गाडी त्यादिशेने नेली. पण वाटेतच ती कार बंग महामार्गावरील मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहो. तर कारचालक जखमी झाला आहे. या प्रकारावरुन पोलिसांच्या निदर्शनास आले की, या महामार्गावर मार्ग वळणाची चिन्हे नाहीत किंवा प्रवेश प्रतिबंधाचा कोणता इशाराही नाही. माहितीचे कोणतेही फलक मार्गावर नसल्याने वाहनांचे अपघात घडत आहेत. आजचा हा अपघात घडताच पोलिसांनी तातडीने कारस्वारांची सुटका केली खरी पण या अपघातांची मालिका कधी संपणार असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. दरम्यान याआधी अशीच एक घटना उत्तरप्रदेशच्या बरेलीमध्ये घडली होती. गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावरून प्रवास करताना कार थेट कालव्यात जाऊन पडली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यातून दोघांची सुटका केली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. तर कारमधील प्रवाशांना सौम्य दुखापत झाली होती.तर २४ नोव्हेंबला देखील गुगल मॅपच्या मोठ्या चुकीमुळे दुर्दैवी घटना घडली होती. बरेली-बदायू मार्गावर अर्धनिर्मित पुलावरुन कार थेट उंचावरुन खाली पडून मोठी दुर्घटना घडली होती. चालती कार पुलावरून खाली पडली आणि या दुर्घटनेत तिघांना जीव गमवावा लागला होता. या घटनेतून पीडब्ल्यूडीचा निष्काळजीपणाही ठळकपणे समोर आला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुगल मॅपच्या प्रादेशिक व्यवस्थापकाला कायदेशीर नोटीस बजावली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/VRWO8h2

No comments:

Post a Comment