म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या ‘इंडिया’च्या घटक पक्षांच्या हालचालींना सोमवारी वेग आला. राज्यसभा नियमावलीतील नियम ६७अंतर्गत असा अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत ७० सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्याचे समजते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आठवडाभरापूर्वीच याबाबतचे वृत्त दिले होते.हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अदानी मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता अमेरिकी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यापर्यंत येऊन ठेपला आहे. या मुद्यावर गोंधळ होत असतानाच राज्यसभेचे सभापती धनखड यांच्या सभागृह चालवण्याच्या पद्धतीवरून विरोधकांत संतप्त भावना आहे. सोरोस मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ झाल्यानंतर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दिग्विजय सिंह ते राजीव शुक्ला यांच्यापर्यंत काँग्रेसच्या सदस्यांनी, धनखड हे उघडउघड पक्षपातीपणा करीत असल्याचा जाहीर आरोप केला. धनखड यांनी सोरेस मुद्यावर कोणत्या नियमांतर्गत चर्चा सुरू केली, असा प्रश्न विरोधकांनी केला.संख्याबळ नसले तरी धनखड यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर विरोधकांत एकवाक्यता दिसते. गेल्या काही दिवसांपासून ‘इंडिया’च्या निदर्शनांपासून दूर राहिलेल्या समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांसह किमान ७० सदस्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याचे सांगण्यात आले. धनखड यांनी सोमवारी भाजपचे लक्ष्मीकांत वाजपेयी, सुधांशू त्रिवेदी, नीरज शेखर यांना सोरोस मुद्यावरच बोलण्याची संधी देताना विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी वारंवार का नाकारली, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. ‘तुम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचा निर्णयच केला असेल तर तुम्ही लोकशाहीची हत्या करत आहात,’ अशी टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. तर विरोधकांना हव्या त्या मुद्यावर ते गदारोळ करणार व हव्या त्या मुद्यावर शांत राहणार, असा निवडक प्रकार चालणार नाही, असे सभागृहनेते जे. पी. नड्डा यांनी सांगितले. कृषी कायद्यांच्या वेळी सभापतींसमोरील टेबलवर चढून नाच करणारे ‘आप’चे संजय सिंह यांनी आम्हाला शिस्त, सभ्यता शिकवू नये, असे संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी फटकारल्यानंतर वातावरण अधिक तापले. सिंह यांना उद्देशून धनखड यांनी महाभारतातील संजय आणि धृतराष्ट्राचा उल्लेख केला. राहुल गांधी पत्रकाराच्या भूमिकेतअधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून अदानी व इतर मुद्यांवरून दररोज कामकाज सुरु होण्यापूर्वी मकरद्वारासमोर ‘इंडिया’चे सदस्य निदर्शने करतात. याचदरम्यान सोमवारी काही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अदानी यांचे मुखवटे घातले होते. ते पाहून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोबाइलवर दोन्ही खासदारांची मुलाखत घेतली. तुम्हा दोघांची पार्टनरशीप कधीपासून चालली आहे, तुम्ही यापुढे काय करणार आहात, आदी प्रश्न गांधी यांनी विचारले. त्यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xsb3CmF
No comments:
Post a Comment