विनित जांगळे, ठाणे : मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला ठाण्यात सोमवारी विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी, मंत्री व आजी - माजी आमदार या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांचे सुपुत्र आदित्य व भिवंडीचे माजी आमदार योगेश पाटील यांच्या कन्या सिद्धी यांचा विवाह सोहळा ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक एक येथील रेमंड मैदानावर पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह विवाह सोहळ्याला हजेरी होते. यासोबत माजी केंद्रीय मंत्री, भाजप खासदार नारायण राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पणनमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, सुलभा गायकवाड, कुमार आयलानी, संजय केळकर, माजी खासदार राजन विचारे, माजी आमदार सुभाष भोईर, रवींद्र फाटक, गीता जैन, क्षितिज ठाकूर आदी मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली.
फडणवीस - ठाकरे भेट टळली
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच ठाण्यात खासगी कार्यक्रमानिमित्ताने हजर होते. राजू पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेत त्यांना या विवाह सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. या सोहळ्यातून राज ठाकरे निघाल्यानंतर फडणवीस दाखल झाले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट थोडक्यात टळली.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/9enVSqm
No comments:
Post a Comment