वृत्तसंस्था, नवी दिल्ली :‘इतिहास हा गुंतागुंतीचा असतो. सध्याच्या राजकारणात स्वतःच्या सोयीने निवडक तथ्यांना समोर आणले जाते. टिपू सुलतानच्या बाबतही काही मर्यादेपर्यंत असेच घडले आहे,’ असा दावा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी केला. ‘गेल्या काही वर्षांत म्हैसूरच्या या शासकाबाबत विशिष्ट प्रकारच्या कथनाचा प्रचार केला गेला,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.इतिहासकार विक्रम संपत यांच्या ‘टिपू सुलतान : द सागा ऑफ मैसूर इंटररेग्नम १७६१-१७९९’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ‘आपल्या भूतकाळाला किती लपवले गेले आहे, जटील मुद्द्यांकडे कसे दुर्लक्ष केले गेले आणि कशा प्रकारे सरकारच्या सोयीनुसार, तथ्ये तयार केली गेली, अशा काही मूलभूत प्रश्नांचा आजही आपल्याला सामना करावा लागतो आहे,’ असे ते यावेळी म्हणाले. ‘गेल्या दशकभरात आपल्या राजकीय व्यवस्थांमध्ये बदल झाले असून त्यामुळे पर्यायी दृष्टिकोन आणि संतुलित बाबींना चालना मिळाली आहे. आम्ही आता व्होटबँकेला बांधील नाही अथवा गैरसोयीचे सत्य समोर आणणे हे राजकीयदृष्ट्या चुकीचे नाही. अजून बऱ्याच विषयांबाबत तेवढीच वस्तुनिष्ठता बाळगण्याची गरज आहे,’ असेही ते म्हणाले. ‘खुल्या मनाने केलेले शैक्षणिक कार्य आणि खरेखुरे वादविवाद हे आपला ‘बहुविध समाज आणि जिवंत लोकशाहीच्या विकासासाठी’ महत्त्वाचे आहेत,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘समकालीन इतिहास लेखनात विशेषतः राष्ट्रीय स्तरावरच्या लेखनात मुख्यतः पूर्वीच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तर, दुसऱ्या बाजूकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि हे अपघाताने घडलेले नाही,’ अशी टीका त्यांनी केली.
टिपू सुलतान हे गुंतागुंतीचे व्यक्तिमत्त्व
टिपू सुलतान ही भारतीय इतिहासातील एक ‘गुंतागुंतीची व्यक्ती’ आहे. एका बाजूला, भारतावर ब्रिटिश वसाहतींचे नियंत्रण लादण्याविरुद्ध प्रतिकार करणारी एक महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचा पराभव आणि मृत्यू हा द्वीपकल्पीय भारताच्या भवितव्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जाऊ शकतो. त्याच वेळी कुर्ग, मलाबार इतकेच नव्हे तर मैसूरसारख्या प्रदेशांमध्येही आजही त्यांच्याबद्दल तीव्र प्रतिकूल भावना व्यक्त होतात,’ असे जयशंकर यांनी सांगितले.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6ADRasn
No comments:
Post a Comment