मुंबई: महात्मा गांधी स्पोर्ट्स, यांनी मुंबई कबड्डी असो. च्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पश्र्चिम विभाग कुमारी गटात अंतिम फेरीत धडक दिली. कुमारी गटाच्या उपांत्य सामन्यात म. गांधी स्पोर्टस् ने आकाश स्पोर्टस् चा प्रतिकार ३४-१५ असा मोडून काढला. पूर्वार्धात १६-०९ अशी आघाडी घेणाऱ्या म.गांधीने उत्तरार्धात तोच जोश कायम राखत आपला विजय सोपा केला. पूजा दशरथ, जागृती नांदवीकर यांच्या चढाई पकडीच्या सर्वांगसुंदर खेळाला याचे श्रेय जाते. आकाशच्या धनश्री कोकरे, पियुष्का शिंदे. यांनी पूर्वार्धात उत्तम लढत दिली. उत्तरार्धात मात्र त्या कमी पडल्या. दुसऱ्या उपांत्य सामन्यात निवारा हिड इंडिया संघाने चुरशीच्या लढतीत वंदे मातरम् संधाला ४६-४४ असे रोखले. पहिल्या डावात दोन लोण देत हिड इंडियाने २४-१३ अशी आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात वंदे मातरम् ने दोन लोणची परत फेड करीत व ४अव्वल पकड करीत ही आघाडी कमी करीत आणली. हिड इंडियाने देखील दुसऱ्या डावात आणखी एक लोण व ३ अव्वल पकड करीत २ गुणांनी सामना आपल्याकडे खेचून आणला. प्रतिज्ञा जळगावकर, तनुजा बळीराम यांच्या झंझावाती खेळाला याचे श्रेय जाते. वंदे मातरम् च्या मोनिका शिगवण, हर्षदा बाले यांनी शेवटच्या क्षणापर्यंत निकारची लढत दिली. कुमार गटात संघर्ष मंडळाने ओम् साईला २२-१४ असे नमविले ते प्रेम चाळके, अश्विन देसाई यांच्या चतुरस्त्र खेळामुळे. ओम् साईचा अभिषेक गोठल चमकला. एच.एस.एफने ओवळी देऊलवाडी वर २८-११ अशी मात केली.महिला गटात स्वराज्य स्पोर्टस् ने सत्यम सेवाचा ३९-०९ असा सहज पराभव केला. स्वराज्यच्या याशिका पुजारी, शर्वरी गोडसे यांच्या आक्रमणाला सत्यम मंडळाकडे उत्तरच नव्हते. याच गटात महात्मा गांधीने प्रबोधन स्पोर्टस् ला ३४-१३ असे, आकाश स्पोर्टस् ने बालयोगी सदानंदचा ३१-१३ असा, तर निवारा हिड इंडियाने माऊली प्रतिष्ठानला १९-११ असे पराभूत केले. मुंबई उपनगरने संयोजन संस्था, चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवली, सेक्टर - २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nDJviZ2
No comments:
Post a Comment