Breaking

Sunday, December 15, 2024

केंद्र आणि राज्यात अशोक चव्हाणांचे वजन कमी पडले? दहा आमदार असूनही मंत्री पदाची हुलकावणी, नांदेडच्या पदरी निराशाच https://ift.tt/x6Uj4Ec

अर्जुन राठोड, नांदेड : महायुती सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार रविवारी करण्यात आला. महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या मंत्री मंडळ विस्तारात नांदेडला मंत्री पद मिळेल अशी शक्यता होती, मात्र नांदेडला संधी काही मिळाली नाही. माजी मुख्यमंत्री आणि महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेचे नऊ आमदार निवडून आणले. त्यामुळे जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल. अशी अपेक्षा असताना जिल्ह्याच्या पदरी निराशा आली. एकेकाळी ज्यांच्या हाताने मंत्रीपदे वाटली अशा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडला मंत्रीपद मिळवण्यात वजन कमी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेससोडून भाजपात प्रवेश केला. काँग्रेसमधील अनेक त्यांचे समर्थक देखील भाजपवासी झाले. पण लोकसभा निवडणुकीत भाजपाला यश काही मिळालं नाही. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आपल्या कन्येसह भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणणं चव्हाणांसमोर एक प्रकारे आवाहन होते. अखेर अशोक चव्हाण यांनी कन्येसह भाजपच्या पाच आमदारांना निवडून आणले. शिवाय जिल्ह्यात नऊच्या नऊ जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याची धुरा देखील सांभाळली होती. या अभूतपूर्व यशानंतर अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेडला मंत्री पद मिळेल अशी शक्यता देखील होती. त्यातच भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, डॉ तुषार राठोड आणि शिवसेना शिंदे गटातून आमदार हेमंत पाटील, राष्ट्रवादीकडून प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव देखील मंत्री पदाच्या चर्चेत होते. पण नांदेडला मंत्री पद काही मिळाले नाही. दरम्यान जिल्ह्याला मंत्री पद न मिळाल्याने नांदेडकरांची निराशा झाली आहे.

मराठवाड्यातून सहा आमदारांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ

आज झालेल्या मंत्री मंडळात मराठवाड्यातून छत्रपती संभाजीनगर, बीड आणि परभणी जिल्ह्याला संधी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे, भाजपच्या पंकजा मुंडे, परभणीच्या मेघना बोर्डीकर यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाठ, भाजपाचे अतुल सावे आणि अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांना मंत्री मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे.

मी मुख्यमंत्री असतो तर नांदेडचा विचार केला असता...

महाराष्ट्रात एक स्थिर सरकार स्थापन झालं आहे. ज्या पद्धतीने मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बॅलन्स टीम झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगल काम करतील अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. नांदेडला मंत्री पद मिळालं नाही, पण भविष्यात मंत्री पद मिळू शकते, असं देखील चव्हाण म्हणाले. जर मी मुख्यमंत्री असतो तर अडीच वर्षानंतर नांदेडला मंत्री पद देण्याचा विचार केला असता, पण मी मुख्यमंत्री नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/uVOx306

No comments:

Post a Comment