Breaking

Friday, December 6, 2024

राज्यसभेत नोटांच्या बंडलांवरुन वादंग; सभापतींनी सिंघवी यांचा नामोल्लेख केल्याने काँग्रेसकडून गोंधळ https://ift.tt/zIcMaSe

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : राज्यसभेत गुरुवारी रात्री काँग्रेस सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांच्या आसनाजवळ ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल आढळल्याची माहिती सभापती जगदीप धनखड यांनी शुक्रवारी दिल्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. सभापती जगदीप धनखड यांनी ही माहिती देताना सिंघवी यांचा नामोल्लेख केल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला.‘राज्यसभेचे कामकाज तहकूब केल्यानंतर, गुरुवारी सभागृहाची नियमित तपासणी करणाऱ्या पथकाला आसन क्रमांक २२२जवळ नोटांचे बंडल सापडले. ५०० रुपयांच्या नोटांच्या या बंडलात १०० नोटा असल्याचे दिसून आले. त्यावर आज सकाळपर्यंत कोणीही दावा केला नाही. ही जागा सध्या तेलंगण राज्यातून निवडून आलेल्या अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आली आहे,’ असे धनखड यांनी सांगताच सभागृहात मोठा गदारोळ होऊन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.‘चौकशी पूर्ण केल्याशिवाय, सत्यता पडताळल्याशिवाय कोणत्याही सदस्याचे नाव उघड करता कामा नये,’ असे विरोधी पक्षनेते म्हणाले. त्यावर, सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी काही मुद्द्यांवर भलतेच गांभीर्य दाखवणारे विरोधी पक्ष संवेदनशील मुद्द्यांवर पांघरूण घालण्याचा, ते दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केला. या प्रकारामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून, सभागृहाच्या कामकाजात कधीही व्यत्यय आणू नये, असा ठराव मंजूर करावा, अशी सूचनाही नड्डा यांनी केली. त्यावर आम्ही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहोत, असे नड्डा का म्हणत आहेत, असा प्रश्न खर्गे यांनी केला. ‘आसन क्रमांक आणि संबंधित सदस्य यांचे नाव सभापतींनी नमूद केले आहे. त्यावर कोणीही आक्षेप घेऊ नये. आसनाजवळ नोटांचे बंडल मिळणे योग्य नाही. आजचे डिजिटल युग आहे आणि कोणीही इतक्या नोटा बाळगत नाही. त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे,’ असे संसदीय कामकाजमंत्री म्हणाले. ही बाब निदर्शनास आल्यावर सदर सदस्य (सिंघवी) गुरुवारी सभागृहात आले होते की नाही, याची चौकशी केली तेव्हा त्यांनी स्वाक्षरी पुस्तकावर डिजिटल स्वाक्षरी केल्याचे आढळले आहे, असे धनखड म्हणाले.आपल्या आसनाजवळ नोटांचे बंडल सापडल्याने सिंघवी यांनी आश्चर्य व्यक्त केले. अशा प्रकरणांवर राजकारण करणे हास्यास्पद असल्याचे सिंघवी म्हणाले. ‘आपण सभागृहात जाताना ५०० रुपयांची एखादी नोट घेऊन जातो; पण बंडल सापडल्याचे मला आश्चर्य वाटते. मी गुरुवारी दुपारी १२.५७ ला सभागृहात गेलो आणि कामकाज एकला तहकूब झाले. त्यानंतर मी अयोध्या रामी रेड्डी यांच्यासोबत संसद उपाहारगृहात जेवण केले आणि दुपारी दीडला बाहेर पडलो. मी केवळ तीन मिनिटे सभागृहात थांबलो होतो’ असेही सिंघवी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. उच्चस्तरीय चौकशी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. तपासावर देखरेख ठेवणाऱ्या उच्चस्तरीय समितीमध्ये सुरक्षा संस्था, राज्यसभा सचिवालय आणि वरिष्ठ खासदारांचा समावेश असेल. नोटांचे बंडल तिथे कसे पोहोचले, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. चौकशीचा अंतिम अहवाल येईपर्यंत भाष्य करता येऊ शकत नाही, असे राज्यसभा सचिवालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. माझ्या आसनाजवळ नोटांचे बंडल सापडले हे आश्चर्यकारक आहे. मी सभागृहात तीन मिनिटेच उपस्थित होतो. हे बंडल कुठून आले, कोणी ठेवले, याबाबत सखोल चौकशी करावी. - अभिषेक मनू सिंघवी


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/taEpue9

No comments:

Post a Comment