Breaking

Friday, January 31, 2025

ट्रेनिंग कॅम्पसाठी निघालेल्या वाहनाला अपघात, लष्करात २३ वर्षे सेवा दिलेले जवान शहीद; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://ift.tt/7Tmv8Jc

संतोष शिराळे, : शहीद वीर जवान चंद्रकांत काळे (वडूज, ता. खटाव) यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शासकीय इतमामात माधवनगर तडवळे रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळेनजीक अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान काळे हे भारतीय सैन्य दलात गेली २३ वर्ष सेवेत होते.

सैन्य दलाच्या वाहनाला दुर्घटना

जवान काळे हे भारतीय लष्करात १८ मीडियम रेजिमेंटमध्ये अटलरी डिपार्टमेंटमध्ये नाईक सुभेदार या पदावर कार्यरत होते. ते १८ मीडियम मराठा तोफखाना रेजिमेंटच्या राजस्थान येथील महाजन फायरींग रेंजमध्ये युध्द अभ्यासाचा सराव घेत होते. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रेनिंग कॅम्पसाठी निघालेल्या सैन्य दलाच्या वाहनाला दुर्घटना घडून जवान काळे शहीद झाले होते.

लष्करात २३ वर्षे सेवा

दरम्यान, जवान काळे यांनी १५ वर्षे लष्करात सेवा बजावल्यानंतर त्यांना वाढीव सेवा देण्यात आली होती. त्यांनी लष्करात २३ वर्षे सेवा बजावली. ते शहीद झाल्याचे भारतीय सैन्य दलाकडून गुरुवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. त्यानंतर अवघ्या वडूज शहरावर शोककळा पसरली होती. आज शुक्रवारी दुपारी जवान काळे यांचे पार्थिव वडूज येथे आणण्यात आला.

शहीद जवान काळे यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना

अंत्यसंस्कारावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दिलीप येळगावकर, प्रांताधिकारी उज्वला गाडे, प्रभाकर देशमुख, तहसीलदार बाई माने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. पोलीस आणि सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँड पथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. वीरपत्नी मनीषा, आई किशाबाई, वडील महादेव, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती, भाऊ हिराचंद यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुलगा श्रेयस यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Awox2Ig

No comments:

Post a Comment