दिगंबर शिंगोटे, देहरादून : महाराष्ट्राच्या मुलींनी ३८व्या राष्ट्रीय स्पर्धेतील स्क्वॉश स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या यशानंतर पूर्ण हॉल ‘टीम महाराष्ट्र, जय महाराष्ट्र’ अन् छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमुन गेले.राजीव गांधी स्टेडियममधील स्क्वॉश हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे महाराष्ट्र दुहेरी मुकुट पटकावणार का, याबाबत उत्सुकता होती. पहिल्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या मुलींसमोर तमिळनाडूचे आव्हान होते. या लढतीत महाराष्ट्राने २-१ अशी बाजी मारली. पहिल्या एकेरीत रतिका सिलनने ठाण्याच्या आकांक्षा गुप्तावर ११-५, ११-८, १५-१७, ११-७ अशी मात केली आणि तमिळनाडूचे विजयाचे खाते उघडले.आव्हान राखण्यासाठी महाराष्ट्राला दुसऱ्या एकेरीत विजय आवश्यक होता. ३५ मिनिटे चाललेल्या या लढतीत अंजली सेमवालने तमिळनाडूच्या पूजा आरतीवर ७-११, १३-११, ११-८, ११-७ अशी मात केली आणि महाराष्ट्राचे आव्हानही राखले.निर्णायक, तिसऱ्या लढतीत पुण्याचा अनिका दुबेने तमिळनाडूच्या शमिना रियाझवर ११-९, ५-११, ११-७, ११-५ अशी मात केली आणि महाराष्ट्राच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. या लढतीदरम्यान शमिनाचा धक्का अनिकाला लागला होता. त्यामुळे तिच्या तोंडातून रक्तही येत होते. मात्र, मेडिकल ब्रेकनंतर अनिकाने जिद्दीने खेळ करून विजय साकारला. विजेत्या संघात आकांक्षा, अंजली, अनिकासह सुनीता पटेलचाही समावेश आहे. महाराष्ट्राच्या पुरुष संघाला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या संघात गौरव लढ्ढा, सूरज चंद, राहुल बैठा आणि ओम सेमवाल यांचा समावेश आहे. अंतिम लढतीत तमिळनाडूने महाराष्ट्रावर २-० अशी मात केली. वेलावन सेंथिलकुमारने महाराष्ट्राच्या सूरज चंदवर ११-७, ११-६, ११-७ अशी मात केली आणि तमिळनाडूला १-० अशी आघाडी मिळवून दिली. आव्हान राखण्यासाठी दुसरी लढत जिंकणे गरजेचे होते. मात्र, या लढतीत अभयसिंहने ओम सेमवालला ११-४, ११-३, ११-७ अशी मात केली आणि तमिळनाडूच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.महाराष्ट्राची या स्पर्धेत दमदार कामगिरी होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र या स्पर्धेत किती पदकं पटकावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/IJh8Wky
No comments:
Post a Comment