Breaking

Tuesday, February 18, 2025

मुंबई इंडियन्सची थेट दुसऱ्या स्थानावर झेप, गुजरात जायंट्सला धुळ चारत साकारला दणदणीत विजय https://ift.tt/pXL6TN2

वडोदरा : मुंबई इंडियन्सला अखेर स्पर्धेतील पहिला विजय गवसला. मुंबई इंडियन्सने यावेळी गुजरात जायंट्ससारख्या दमदार संघाला धुळ चारत स्पर्धेच्या गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.मुंबई इंडियन्सच्या संघाच्या गोलंदाजांनी यावेळी विजयाचा पाया रचला. कारण मुंबईच्या संघाने फक्त १२० धावांत गुजरातच्या संघाला ऑल आऊट केले. गुजरातच्या संघावर ही सर्वात मोठी नामुष्कीची वेळ होती. मुंबईने दुसऱ्या षटकापासून गुजरातच्या संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर गुजरातचा संघ सावरूच शकला नाही. गुजरातकडून सर्वाधिक धावांची खेळी ही हर्लिन देओलने साकारली. हर्लिनने यावेळी चार चौकारांच्या जोरावर ३२ धावा केल्या, गुजरातच्या पाच फलंदाजांना यावेळी दोन अंकी धावसंख्याही रचता आली नाही. मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक तीन बळी हेयली मॅथ्यूजने घेतले.मुंबई इंडियन्सचा संघ गुजरातच्या १२१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा, पण त्यांना चौथ्याच षटकात पहिला धक्का बसला. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघासाठी विजयाचा मार्गात सिंहाचा वाटा उचलला तो नॅट सिव्हर ब्रँटने. नॅटने यावेळी गुजरातच्या गोलंदाजीवर कडक प्रहार केला. नॅटने फक्त ३९ चेंडूंत तब्बल ११ चौकार लगावले आणि ५२ धावांची दमदार खेळी साकारली. नॅट मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल, असे वाटत होते. पण गुजरातच्या प्रिया मिश्राने तिला पायचीत पकडले आणि तिला बाद केले. पण बाद होण्यापूर्वी नॅट हे तिचे काम करून गेली होती.नॅट बाद झाली तरी मुंबई इंडियन्सने आपला आक्रमक पवित्रा सुरुच ठेवला. नॅटनंतर फलंदाजीला आलेल्या कामिनीने तर पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. त्यानंतरच्या चेंडूवर सजनाने चौकार लगावला आणि मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबई इंडियन्सने हा सामना पाच विकेट्स राखून जिंकला आणि त्यांचा हा या स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला. यापूर्वी झालेल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला होता. मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयासह आपल्या गुणांचे खाते उघडले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/iXF2D4v

No comments:

Post a Comment