
मुंबई : बीडमधील संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यानंतर संपूर्ण राज्य हादरले होते. त्यांच्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला असून हत्या प्रकरणाची त्रिकोणी चौकशी सुरु आहे. यातच आता संतोष देशमुखांच्या हत्येचे काळीज चिरणारे फोट समोर आले आहेत. क्रौर्याच्या परिसीमा कशा गाठल्या जाऊ शकतात, याची प्रचिती या फोटोंमधून येत आहे. दुपारी तीनच्या सुमारास देशमुखांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यादिवशीच संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला. त्यांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे त्यांच्या अवस्थेवरुन स्पष्ट होत होते. आता त्यांच्या हत्येप्रसंगीचे फोटो समोर आल्याने साऱ्यांचा थरकाप उडाला आहे. यावर आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'गेले ८० दिवस आम्ही हेच तर सांगत आहोत. संतोष देशमुख यांच्या फोटोचे वर्णन माझ्या भाषणात मी केलेले आहे. तेव्हा माझी टिंगल टवाळी करीत होते. हे हरामी, नालायक, जल्लाद संतोष देशमुख यांच्यावर लघुशंका करीत होते हे पाहून तुमचे हृदय कुठे हरवले होते. त्यांनी केलेल्या कृतीला राजाश्रय आहे, त्यामुळेच हे घडले आहे.' तर आव्हाडांनी देशमुखांच्या मुलांबाबतही सहवेदना व्यक्त केली आहे. 'हे फोटो त्यांची मुलं बघतील तेव्हा त्यांच्या मनाचं काय होईल? देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले तर आता धनंजय मुंडे यांचा ते आता राजीनामा घेतील.' असे आव्हाड म्हणाले. वाल्मिक कराडविरोधात कोणी बोलायला तयार नाही. कारण हा बाहेर आल्यावर आपल्याला मारेल, अशी दहशत समाजात आहे, असे आव्हाडांनी नमूद कले. तर पुढे ते म्हणाले, 'वाल्मिक कराड याच्या बरेकमध्ये जाऊन त्यांची मालिश करतात काय? एखाद्या जखमी माणसावर हे लघुशंका करतात, यांना लाज नाही वाटत का? धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे सरकार घेणार नाही, म्हणून मी त्यांचा राजीनामा आता मागत पण नाही. पण, महाराष्ट्राने तुम्हाला नक्कीच माफ केलेले नाही. या सगळ्याचा सूत्रधार एकच आहे तो म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याचा बाप म्हणजे धनंजय मुंडे आहे.' असे म्हणत आव्हाडांनी पुन्हा मुंडेंना धारेवर धरले आहे. 'आमच्या बाकी कोणाकडून अपेक्षा नाहीत, मात्र मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती, मी तर मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मुलीची शपथ दिली होती, असेही म्हणत आव्हाडांनी पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची आठवण करुन दिली आहे. तर 'वाल्मिक कराड माझ्या जातीचा नाही, मात्र मी आजही म्हणेन की त्याला भर रस्त्यात फाशी द्या. आताही खुलेआम सांगतो, कोणाचा तरी गेम इथे होणार आहे. या सर्व प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तर आता ११ वाजता फ्लॅश येईल धनंजय मुंडेंचा राजीनामा. आणि आम्ही रोज हा मुद्दा मांडणारच आहोत.' असे म्हणत आव्हाडांनी मुंडेंसह सरकारलाही कोंडीत पकडले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/D4zrZMq
No comments:
Post a Comment