
धनाजी चव्हाण, परभणी : परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरण हे वरदान आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्यावरच परभणी जिल्ह्यातील ९७,४४० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. पण मागील काही वर्षात परभणी जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत जायकवाडीचे पाणी जात नाही. कारण जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी सोडण्यात येणारे पाणी हे कमी क्षमतेने सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर जायकवाडी धरणातील परभणी जिल्ह्याचे हक्काचे असलेल्या पाण्यामधील पंधरा टक्के पाणी, पैठणकडे वळवण्याचा डाव काही झारीतील शुक्राचार्य करत आहेत, असा थेट आरोप करत शिवसेना यांनी परभणी जिल्ह्याला न्याय मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. खासदार संजय जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील बहुतांश शेती ओलिताखाली येत आहे. पण या कालव्यात बाराशे क्युसेक्सने पाण्याचा प्रवाह सोडणे अपेक्षित असताना केवळ ८०० क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे, तर दुसरीकडे जालना आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कालव्यामध्ये १३०० क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे. परभणी जिल्ह्याची तब्बल ९७,४४० हेक्टर जमीन ही या जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. जिल्ह्याचे जवळपास ६८ टक्के क्षेत्रफळ हे जायकवाडी कॅनॉलच्या माध्यमातून ओलिताखाली येते. परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडीच्या पाण्याचा वापर केवळ ३७ टक्के एवढाच आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यातील मिळून ४४ हजार हेक्टर जमीन ही जायकवाडीच्या पाण्यामुळे ओलिताखाली येते. या भागात १३९० क्युसेक्सने पाणी सोडले जाते. जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्याची मिळून केवळ ३२ टक्के जमीन जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. असे असले तरी मात्र या भागात पाणी वापर मात्र ६३ टक्के एवढा आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही राजकीय पुढारी आणि गोदावरी पाटबंधारे महामंडळातील काही अधिकाऱ्यांनी मिळून परभणी जिल्ह्यावर मागील काही वर्षापासून अन्याय करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. आणि त्यामुळे सर्वात जास्त जमीन जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या परभणी जिल्ह्याला कमी क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे.त्याचबरोबर परभणी जिल्ह्याच्या वाट्याच्या पाण्यामधील पंधरा टक्के पाणी पैठणकडे वळवण्याचा घाट काही राजकीय पुढारी आणि गोदावरी खोऱ्यातील अधिकाऱ्यांनी घातला आहे. त्याचबरोबर जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही छोट्या धरणांमध्ये देखील जायकवाडीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर साठा बेकायदेशीरपणे करण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यावर जायकवाडीच्या पाण्यावरून मोठ्या प्रमाणावर अन्याय करण्यात येत असल्याने येणाऱ्या काळात मोठे आंदोलन करणार असल्याचेही खासदार संजय जाधव म्हणाले. एकंदरीतच आता जायकवाडीच्या पाण्यावरून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वाद वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील मोठ्या पुढाऱ्यकडून जायकवाडीचे पाणी आपल्या भागात मोठ्या प्रमाणावर वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आता परभणीला न्याय मिळवून देण्यासाठी खासदार संजय जाधव यांनी चांगलीच आक्रमकता दाखवली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/9u5GOCw
No comments:
Post a Comment