जितेंद्र खापरे, : नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील गुमगाव भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका दोन वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिला जागीच ठार केले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ही घटना गुरुवारी दुपारी अंदाजे १.३० वाजता घडली. हर्षिता रामसिंग ही दोन वर्षांची मुलगी आपल्या आईसोबत गुमगाव नदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी आली होती. आई कपडे धुत असताना हर्षिता खेळता खेळता पुलाखाली पोहोचली. काही वेळानंतर जेव्हा तिची आई तिला शोधू लागली, तेव्हा तिला पुलाखाली भयानक दृश्य पाहायला मिळाले. हर्षिता रक्ताने माखलेली होती आणि तिच्या आसपास मोकाट कुत्र्यांचा वावर होता. दरम्यान, रामसिंग आणि लक्ष्मी यांना तीन मुली व दोन मुले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून रामसिंग आणि लक्ष्मी आपल्या अपत्यांसह सासू रेखा रामटेके यांच्याकडे राहतात. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासानुसार, मुलीवर कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीर जखमी केले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी हर्षिताला एम्समध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिसरात मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, यावर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असून, लहान मुले आणि वयोवृद्धांना विशेष धोका निर्माण झाला आहे. नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. स्थानिकांनी कुत्र्यांचे निर्बंध आणि पुनर्वसन यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. सध्या हिंगणा पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/jCdwN1K
No comments:
Post a Comment