Breaking

Monday, March 24, 2025

मुंबईत आगीची मोठी दुर्घटना, धारावीत गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट https://ift.tt/InC7gAX

मुंबई : धारावी येथे आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. यानंतर एकामागे एक सिलेंडरचा स्फोट होताना दिसत आहे. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या तरी या आगीत कुठल्याची जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. पण या गाडीत मोठी वित्तहानी होण्याची शक्यता आहे. धारावी बस डेपोजवळ ही घटना घडली आहे. धारावीच्या पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीत अचानक आग लागली. यानंतर गाडीत असलेल्या सिलेंडरचा एकामागे एक स्फोट होत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बस डेपोजवळच ही घटना घडली आहे. घटना घडली तिथे अनेकांकडून अनधिकृतपणे गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे अनेक दुचाकी आगीत जळूक खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे संबंधित रोड हा VIP मार्ग असल्याची माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.या आगीमुळे धारावीत खळबळ उडाली आहे. धारावीचे नागरीक रस्त्यावर उतरले आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. अग्निशामक दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्मिशामक दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. आग आजूबाजूच्या वस्तीत पसरणार नाही याची काळजी घेतली जात आहे.या घटनेनंतर स्थानिक आमदार ज्योती गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्योती गायकवाड यांनी नागरिकांना घटनास्थळीकडे जाणं टाळावं, असं आवाहन केलं आहे. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. धारावीकरांनी घाबरुन जावू नये, असं देखील आमदार ज्योती गायकवाड म्हणाल्या आहेत.

अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

दरम्यान, अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रणात मिळवल्याची माहिती मिळत आहे. आता आग लागलेल्या गाडीचं कुलिंगचं काम सुरु आहे. या आगीमुळे मोठी खळबळ उडाली होती. ही आग नेमकी का लागली? तसेच सिलेंडरची गाडी तिथे उभी कशी होती? असे अनेक प्रश्न उपस्थति झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/qUYdLZh

No comments:

Post a Comment