Breaking

Tuesday, March 4, 2025

नात्यातील अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाला राग अनावर; तरुणाला जागीच संपवलं, घटनेने खळबळ https://ift.tt/MKNgmTQ

स्वप्निल एरंडोलीकर, : नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून हत्येची घटना समोर आली आहे. राहुल आप्पासाहेब सुर्यवंशी (वय ३८, मूळ गाव येडूर मांजरी, कर्नाटक, सध्या रा. प्रकाशनगर गल्ली नं ३, कुपवाड) या तरुणाच्या डोक्यात मामाने आणि त्याच्या मुलाने दगड घालून आणि लोखंडी रॉडने हल्ला करुन निर्घून हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी, ४ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संदीप रावसाहेब सावंत (वय ५२), सौरभ संदीप सावंत (वय २२, दोघेही रा. प्रकाशनगर गल्ली नं. ३, कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राहुल सुर्यवंशी हा मूळचा कर्नाटक राज्यातील येडूर मांजरीचा आहे. त्याची आई आणि भाऊ हे दोघे गावी राहतात. गेल्या काही महिन्यापूर्वी राहुल सुर्यवंशी हा कामानिमीत्त कुपवाड येथे आला होता. तो कुपवाड औद्योगिक वसाहतमधील एका कंपनीत काम करत होता. आज मंगळवारी सुट्टी असल्याने तो घरी एकटाच होता. राहुल सुर्यवंशी हा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढत होता. पिडित मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी राहुल सुर्यवंशी याला वेळोवेळी समज दिली होती. तरीही तो ऐकत नव्हता.मंगळवारी दुपारी राहुल सुर्यवंशी याने पिडित मुलीसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नातेवाईक असलेला सौरभ सावंत आणि संदीप सावंत याच्या निदर्शनास आला. संशयित सौरभ सावंत याचा राग अनावर झाला. सौरभ याने रागाच्या भरात सुर्यवंशी याला पकडून मारहाण केली. तर संशयित संदीप सावंत याने लोखंडी रॉडने हल्ला केला. संशयित सौरभ याने शेजारी पडलेला दगड हातात घेऊन त्याच्या डोक्यात घातला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसताच संशयित फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीने पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुल सुर्यवंशी याला आयुष हेल्पलाइन टीमच्या मदतीने सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी संशयित सौरभ सावंत आणि संदीप सावंत यांना तातडीने ताब्यात घेतलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, गृह विभागाच्या उप अधीक्षक एम. विमला यांनी घटनास्थळी भेट दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AzoZp4P

No comments:

Post a Comment