Breaking

Thursday, April 24, 2025

'तुमच्यापैकी हिंदू कोण? बाबांनी हात वर करताच डोक्यात गोळी झाडली', घटनाक्रम सांगताना लेकाला अश्रू अनावर https://ift.tt/Bt4clKg

डोंबिवली : ‘आम्ही जमिनीकडे तोंड करून झोपलो होतो, माझा हात माझ्या बाबांच्या डोक्याजवळ होता. दहशतवाद्याने हिंदू कोण? असा प्रश्न विचारताच बाबांनी हात वर केला आणि त्याने माझ्या बाबांच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी माझ्या हाताला घासून गेली. तत्पूर्वीच त्यांनी माझ्या दोन मामांना मारले होते...’ असा अंगाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी कथन केला. ‘त्या नराधमांना आणि सगळ्याच दहशतवाद्यांना दिसतील तिथे गोळ्या घाला, आम्हाला न्याय द्या,’ अशी मागणी त्यांनी केली.पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तील हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले या तिघांचा मृत्यू झाला. यात स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळताना इतर नातेवाईक जखमी झाले आहेत. या सर्व नातेवाइकांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. संजय लेले हे रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना, त्यांचा २० वर्षांचा मुलगा हर्षल याने वडील आणि दोन्ही मामा यांना लष्कराच्या भरंवशावर सोडून आजारी आईला भावाच्या मदतीने उचलून आणले. तिघांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतरही याबाबत कुटुंबीयांना काहीही न सांगता, त्यांच्या उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना मदत करतानाच, डोंबिवलीतील नातेवाईकांना मदतीसाठी बोलावले. घडलेली घटना कथन करताना त्याचा कंठ दाटून आला होता.

दुपारी अचानक गोळीबार सुरू झाला -

‘पहलगाम फिरून दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आम्ही जवळच्या स्टॉलवर भेळ खात होतो. शंभरहून अधिक पर्यटक त्या परिसरात होते. अचानक फ्यूज उडाल्यासारखा आवाज आला. हा आवाज हळुहळू जवळ येऊ लागला. गोळीबार होत असल्याची ओरड होताच आम्हीही पळू लागलो. दोघे गणवेशधारी आमच्या दिशेने येत होते, त्यांच्या डोक्यावर कॅमेरा होता. आम्ही क्षणार्धात जमिनीच्या दिशेने तोंड करून झोपलो. ‘आम्हाला मारू नका, आम्ही काही केले नाही,’ इतकीच दोन वाक्ये हेमंत मामाने उच्चारताच त्याने त्यांच्यावर गोळी झाडली. यामुळे घाबरलेल्या अतुल मामाने मामी आणि ऋचाला पोटाशी धरले. तर दहशतवाद्याने त्यांना बाजूला होण्यास धमकावत मामाच्या पोटात गोळी घातली.

तुमच्यापैकी हिंदू कोण? विचारताच गोळी मारली -

‘तुमच्यापैकी हिंदू कोण?’ असे पुन्हा विचारल्यावर माझ्या बाबांनी हात वर करताच, त्याने त्यांच्या डोक्यात गोळी घातली. यानंतर ते दोघे चालत गेल्याचे डोळ्यांच्या कोपऱ्यातून दिसले. सात-आठ मिनिटांत गोळीबार करून ते निघून गेले,’ असे हर्षल याने सांगितले. ‘आम्ही तिघांनाही उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतक्यात तिथे आलेल्या काहींनी जखमींच्या मदतीसाठी आर्मी येत असल्याचे सांगत, आम्हाला पळण्याचा सल्ला दिला. डोंगरावरून घोड्यावरून किंवा चालतच चार तास उतरावे लागणार होते. अनेकांना घोडेस्वारांनी मदत केली. एका गाईडने, नंतर एका घोडेस्वाराने माझ्या आजारी आईला पाठीवर घेऊन उतरवून दिले. पायथ्याशी आर्मीच्या मदतीने तिला रुग्णालयात नेण्यात आले. रात्री सात वाजता आर्मीच्या अधिकाऱ्याकडून मला तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र कुटुंबीयांना माहिती देऊ नको, सांगितले होते. यानंतर डोंबिवलीहून निघालेले नातेवाईक पोहोचेपर्यंत मृतदेहाची ओळख पटवून पोस्टमार्टेम प्रक्रिया पूर्ण केली,’ असे हर्ष याने सांगितले. आम्हाला स्थानिकांनी खूप मदत केली. तिथल्या एका अधिकाऱ्याने आमची राहण्याची व्यवस्था केली होती, असे त्याने सांगितले. ‘आम्ही फिरायला गेलो होतो. आमचा तो पहिलाच दिवस होता. असे काही होईल असे वाटलेच नव्हते. आता सरकारच आम्हाला न्याय देईल,’ असे अतुल मोने यांची मुलगी ऋचा मोने हिने सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sq5zJ3c

No comments:

Post a Comment