इस्लामाबाद : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर () भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, अशातच पाकिस्तानी सेनेतील लष्करातील माजी मेजर तथा विश्लेषक आदिल रझा (Adil Raza) यांनी खळबळजनक दावा केला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम या निसर्गरम्य अशा पर्यटनस्थळी झालेल्या रक्तरंजित घटनेमागे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर (Asim Munir) यांचा डाव असल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे. आदिल रझा म्हणाले की, असीम मुनीर चांगलेच जाणून होते की, भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुऊर्जेचे संतुलन आहे, ज्यामुळे भारत मोठे युद्ध छेडणार नाही. परंतु मर्यादित प्रत्युत्तर निश्चितच शक्य आहेत. अशा परिस्थितीत, पहलगामचा दहशतवादी हल्ला हा सुनियोजित कट असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पाकिस्तानी जनतेला भारतविरोधी आणि काश्मीरच्या समर्थनार्थ अजेंड्यावर प्रोत्साहित करुन त्यांना एकत्रित करण्याचा उद्देश दिसतो.आदिल राजा यांनी असेही नमूद केले की, स्वत:ला एक प्रभावी नेता म्हणून सादर करण्याची इच्छा या हल्ल्यामागे दिसून येते. आणि हे तेव्हा घडवून आणले गेले, जेव्हा पाकिस्तानात सैन्याविरोधात संताप आहे आणि लोक सैन्यावर इम्रान खानचा जनादेश चोरल्याचा आरोप करत आहेत. आदिल रझा पुढे पहलगाम हल्ल्याबाबत गंभीर आरोपही केला आहे. आदिल रझा म्हणाले, 'फॉल्स फॅग ऑपरेशन' होते. म्हणजे अशाप्रकारचा हल्ला ज्यामध्ये स्वत: हल्ला घडवून आणून त्याचं खापर मात्र दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडायचं. आदिल रझांनी असंही नमूद केले की, असीम मुनीर हे पुलवामा हल्ला झाला तेव्हा आयएसआयचे प्रमुख होते. आता पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते लष्करप्रमुख आहेत. यासोबत रझांनी असेही स्पष्ट केले की, दोन्ही हल्ल्यांमागील त्यांची भूमिका काय हे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांमधील सूत्रांनी देखील मान्य केलेले आहे. या सर्व चकीत करणाऱ्या दाव्यांसोबतच रझा यांनी असीम मुनीर यांच्या अलिकडच्या इस्लामाबाद भाषणाचा उल्लेख देखील केला आहे. ज्यामध्ये त्यांनी कथितरित्या हिंदूविरोधी भाष्य केले आहे. नंतर लगेचच पहलगामची घटना समोर आली, ज्यामध्ये पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले तेव्हा त्यांना त्यांच्या धर्माच्या आधारावर हल्ला करण्यात आला. रझा यांनी या सर्व वागणुकीला मानसिकदृष्ट्या असंतुलित व्यक्तीचे वागणे म्हटले आहे. तसेच 'असीम मुनीर इम्रान खानच्या लोकप्रियतेला घाबरत आहेत, म्हणून ते अशी पावले उचलून जनतेची सहानुभूती मिळवू इच्छितात,' असा दावाही त्यांनी केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2rJTLZU
No comments:
Post a Comment