मुंबई:- अमर क्रीडा, श्री संस्कृती प्रतिष्ठान, शताब्दी स्पोर्टस् यांनी वरळीच्या नवमित्र क्रीडा मंडळाने आपल्या "सुवर्ण महोत्सवी" वर्षानिमित्त आयोजित केलेल्या द्वितीय श्रेणी (ब) गटाच्या कबड्डी स्पर्धेते उपांत्य फेरीत धडक दिली. ओम् साईनाथ सेवा विरुद्ध खेळणारा संघ वेळेत उपस्थित न राहिल्याने त्यांना देखील उपांत्य फेरीत खेळण्याचा मान मिळाला. अमर मंडळ विरुद्ध श्री संस्कृती, शताब्दी विरुद्ध ओम साईनाथ सेवा अशा उपांत्य लढती होतील. मुंबई शहर कबड्डी असो. च्या मान्यतेने वरळी येथील वरळी स्पोर्टस् क्लबच्या "स्व. यशवंत साळवी मॅटच्या क्रीडांगणावर "स्व. दीपक वेर्लेकर चषका" करिता होणाऱ्या आजच्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात अमर मंडळाने श्री साई क्लबला २४-२३ असे चकवित आपली आगेकूच सुरू ठेवली. विश्रांतीला लोण देत १६-०५ अशी आघाडी घेणाऱ्या अमरला विश्रांतीनंतर श्री साईने विजयासाठी चांगलेच झुंजविले. विश्रांतीनंतर लोण देत तसेच २ अव्वल पकड करीत सामना रंगतदार अवस्थेत नेला. पण विजयाचे ध्येय काय त्यांना गाठता आले नाही. अमरच्या या निसटत्या विजयात यश येळमकर, अनिकेत वारंग यांचा चढाई पकडीचा धूर्त व संयमी खेळ महत्त्वपूर्ण ठरला. नितेश पाटील, तेजस गायकवाड, संदेश पाटील यांचा खेळ श्री साईला विजयी करण्यात कमी पडला. श्री संस्कृतीने पूर्वार्धातील ५-७ अशा पिछाडीवरून आंबेवाडीचा प्रतिकार २१-१५ असा मोडत उपांत्य फेरी गाठली. ऋषिकेश शिंदे, यश माचीवले यांच्या सुरुवातीच्या खेळाने आंबेवाडीने पूर्वार्धात आघाडी घेण्यात यश मिळविले होते. पण उत्तरार्धात संस्कृतीच्या विनायक यादव यांनी एका चढाईत ३ गडी टिपत संघाचा विजयाचा मार्ग मोकळा केला. त्याला अमन राणाची चढाईत, तर रोशन रायची पकडीची उत्कृष्ट साथ लाभली. शेवटच्या सामन्यात शताब्दी स्पोर्टस् ने विजय बजरंग संघाला २३-१६ असे नमवित उपांत्य फेरी गाठली. सावध सुरुवात करीत पहिल्या डावात ९-७ अशी आघाडी घेणाऱ्या शताब्दीने दुसऱ्या डावात देखील तोच मार्ग अवलंबित आपला विजय निश्र्चित केला. करण जैसवाल शताब्दी कडून, तर दर्शन कांबळे विजय बजरंग कडून उत्कृष्ट खेळले. या मंडळाच्या स्थापनेत ज्यांनी महत्वाचा सहभाग घेतला व मंडळाच्या जडण घडणेत ज्यांचा मोलाचा वाटा होता अशा व्यक्तींचा या स्पर्धेच्या निमित्ताने यथोचित सन्मान करण्यात आला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/yJpZIrq
No comments:
Post a Comment