Breaking

Wednesday, April 2, 2025

शासन कर्जमाफी करेल अशी आशा होती, २० हजार शेतकऱ्यांनी थकवले सव्वाशे कोटी; आता बँकेचा इशारा https://ift.tt/yEgitzY

अर्जुन राठोड, नांदेड : निवडणुकीपूर्वी कर्ज माफीचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं होतं. मात्र सत्ता आल्यानंतर महायुती सरकाने कर्ज माफीच्या आश्वासनावरुन घुमजावं केल्याचं चित्र आहे. अर्थ संकल्पात कर्ज माफीची घोषणा होणार अशी राज्यातील शेतकऱ्यांना आशा होती, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी बाबत कुठलीच घोषणा केली नाही. दुसरीकडे कर्ज माफी होणार, या आशेने नांदेड जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांनी शंभर ते सवाशे कोटी रुपये कर्ज थकवल्याचं समोर आलं आहे. नांदेड मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू समजली जाते. मागील वर्षी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने ५९ हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं. यात ३९ हजार शेतकऱ्यांनी कर्जाची परफेड केली, तर २० हजार शेतकऱ्यांनी कर्ज थकवलं आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ माफ करणार, अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती, मात्र महायुतीने सत्तेत आल्यानंतर कर्ज माफीच्या मुद्द्याला बगल दिली. आश्वासनाच्या आशेवर राज्यातील शेतकरी बसले होते, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जवळपास २० हजार शेतकऱ्यांनी कर्जाची परफेड केली नाही. या शेतकऱ्यांकडून शंभर ते सव्वाशे कोटी रुपये थकबाकी असल्याचं बँक प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना कधी आस्मानी, तर कधी सुलतानी संकटचा सामना करावा लागतो. अशात सरकार आधार देईल आणि मदत करेल अशी आशा शेतकऱ्यांना असते, मात्र कर्जमाफीला बगल दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे.

बँकेने दिला कारवाईचा इशारा

दरम्यान थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा समोर आल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वसुलीचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जाचं वाटप केलं जातं. या ही वर्षी ५९ हजार शेतकऱ्यांना कर्जाचं वाटप करण्यात आलं होतं, पण अनेक शेतकऱ्यांनी कर्ज माफ होईल या आशेने परतफेड केली नाही. शासनाच्या निर्देशानुसार कर्जाची वसुली करणार असल्याचं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कदम यांनी दिले आहेत. ज्या भागात अतिवृष्टी झाली, दुष्काळ झाला अशा भागात सक्तीची वसुली केली जाणार नाही, पण इतर शेतकऱ्यांवर कायद्याच्या चाकोरीत राहून कर्जाची वसुली केली जाणार आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करावी अशी विनंती बँकेच्या अधिकाऱ्यांकडून केली जातं आहे.

बँक तोट्यातून मुक्त

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही १९९७ पासून तोट्यात होती. तब्बल २८ वर्ष बँकेला तोटा सहन करावा लागला. २०२५ मध्ये मात्र बँकेने कात टाकत संचित तोट्‌यातून मुक्त होऊन निव्वळ नफ्यामध्ये आल्याचं बँकेचे अध्यक्ष भास्कराव पाटील खतगावकर यांनी सांगितलं. राज्य शासनाकडून बँकेला मिळणारं व्याज अनुदानाची २.५० टक्के रक्कम बँकेला मिळवून देण्यासाठी आणि भरतीसाठी राज्य शासनाचे परवानगीसाठी अनेक नेत्यांचं बहुमोल सहकार्य लाभलं. ज्यामुळे मार्च २०२५ अखेर बँकेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा असून नफ्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. बँकेच्या ठेवी मार्च २०२५ अखेर ८८९ कोटी आहेत. मार्च २०२४ तुलनेत ११७ कोटीने ठेवीमध्ये वाढ झालेली आहे. बँकेचा संचित तोटा भरून काढून निव्वळ नफ्यामध्ये आलेली असून NPA चं प्रमाण १५ टक्के आत आलं आहे, असं बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी सांगीतलं. बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दिशेने बँक व्यवस्थापन आणि प्रशासनाची वाटचाल चालू असल्याचा विश्वास बँकेचे अध्यक्ष भास्कररावजी पाटील खतगावकर यांनी व्यक्त केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/E6oAsD1

No comments:

Post a Comment