अभिजीत दराडे, पुणे : पुण्यामध्ये आज थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पोर्शे अपघातासारखाच ही भयंकर घटना घडली आहे. आज पुण्याच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत भावे हायस्कुल जवळ भरधाव कारने थेट १२ जणांना उडवले. या अपघातात सर्वजण जखमी झाले आहेत,तर ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमींमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यासंदर्भात आता स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी जखमी विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे काम केले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असता, विद्यार्थ्यांचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले आहे. फडणवीस यांनी पुण्यातील कार दुर्घटनेत जखमी झालेल्यांचा खर्च सरकार उचलणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जखमी विद्यार्थ्यांचा पूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यासोबतच जखमींपैकी काही विद्यार्थ्यांची उद्या परीक्षा आहे, त्यासंदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेणार असल्याचे फडणवीसांनी आश्वासन दिले आहे.रासने पुढे म्हणाले, भावे हायस्कूलजवळ झालेल्या अपघातातील जखमींमध्ये १२ जणांपैकी काही विद्यार्थी असून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. नुकसान होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. त्यामुळे अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत इथे राज्यभरातील हजारो तरुण येतात. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी इथे अनेक अभ्यासिका आहेत. तर अपघात घडला त्याठिकाणीही अभ्यासिका आहेत. येथे अनेक विद्यार्थी वास्तव्यास आहेत. बाजूलाच भावे हायस्कूल आहे. अपघात सायंकाळी घडला जेव्हा विद्यार्थी स्टॉलवर उभे राहून चहा पित होते. इतक्यात भरधाव कारने तेथे उपस्थित अनेकांना उडवले. या घटनेचा थरकाप सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दारूच्या अंमलाखाली हुंदाई औरा गाडीचा चालक आणि त्याच्यासोबतचा एक साथीदार हे गाडीमध्ये असताना एक्सीलेटरचा ताबा सुटल्याने तिथे उभ्या असणाऱ्या लोकांना जाऊन धडकले. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकासह तिघांना ताब्यात घेतले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/INgGcUE
No comments:
Post a Comment