Breaking

Friday, May 23, 2025

पोटदुखी आणि उलटीचा त्रास झाला अन्...; कुटुंबानं दोन चिमुकली लेकरं गमावली, पंचक्रोशीत हळहळ https://ift.tt/etbN6G5

नयन यादवाड, कोल्हापूर : पोटदुखी आणि उलटीचा त्रास होऊन एकाच कुटुंबातील दोन बालकांचा अवघ्या काही तासांच्या अंतरावर दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हातकणंगले तालुक्यातील संभापूर येथे ही घटना घडली. वरद सागर पोवार (वय 6) आणि विराज सागर पोवार (वय 4) अशी या भावंडांची नावे आहेत. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, संभापूर येथील पोवार मळ्यात राहणाऱ्या पोवार कुटुंबातील सागर पोवार यांना दोन मुले वरद आणि विराज होती. घरात अगदी हसत खेळत वातावरण होतं. मात्र मंगळवारी अचानक दोन्ही मुलांना पोटदुखी व उलटीचा त्रास होऊ लागला. यामुळे सागर पोवार यांनी पेठ वडगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचार घेऊन त्यांना घरी नेण्यात आले. मात्र गुरुवारी पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केलं. यावेळी विराजची तब्येत आणखी खालावली आणि उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं. विराजचे अंत्यसंस्कार आटोपले. इतक्यात दुसरा मुलगा वरद याची देखील तब्येत खालावू लागल्याने त्याला त्याच रात्री कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र शुक्रवारी सकाळी त्याचे मृत्यूची झुंज अपयशी ठरली आणि त्याचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. हसत्या खेळत्या घरातील दोन लहान मुलं अवघ्या काही तासांच्या अंतरावर दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावरच शोककळा पसरली आहे. नातेवाईकांचा दवाखान्यात सुरू असलेला आक्रोश पाहून तेथील अनेकांचे मन हेलावले. वरद आणि विराजची आई पूजा पोवार यांना देखील कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली असून केवळ पोटदुखी आणि उलटीमुळे दोघांचाही काही वेळात मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान दोघांचाही अंतिम शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5I3Ff74

No comments:

Post a Comment