म.टा.प्रतिनिधी, नागपूर: पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदी नाल्यांची स्वच्छता, पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता, संरक्षक भिंतीची दुरुस्ती अशी कामे अंतिम टप्प्यात असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात स्थिती अत्यंत वेगळी असून संरक्षक भिंतीची कामे अजूनही अर्धवट आहेत. त्यामुळे पुन्हा नदी, नाल्याच्या जवळपास असलेल्या रहिवाशी वस्त्यांना पुराचा धोका कायम आहे. तर पावसाळी नाल्यांची कामेही झाली नसल्याने पावसाळ्यात वस्त्या जलमय होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.शहरात 23 सप्टेंबर 2023 मध्ये अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे नागनदीसह, पिवळी नदीच्या संरक्षक भिंती खचल्या होत्या. या कामासाठी राज्य सरकारने पूर व्यवस्थापनासाठी 196 कोटींचा निधी मंजूर केला होता. यामध्ये नद्यांच्या संरक्षक भिंती आणि नाल्यांच्या कामांचा समावेश होता. सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत कंत्राटदारांकडून संथगतीने सुरू असलेल्या कामांबद्दल नाराजी व्यक्त केली. ही कामे अनेक मोठ्या कंत्राटदारांना देण्यात आली होती. यातील बहुतांश कामे या बड्या कंत्राटदारांनी लहान कंत्राटदारांना दिली. या कंत्राटदारांकडे यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा व अत्यंत अल्प मनुष्यबळ असल्याने या कामांवर परिणाम झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे अजूनही न झाल्याने पुराचा धोका कायम असल्याची भिती अनेक माजी नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.या कामांसाठी महापालिकेने दहा झोन अंतर्गत कामांचे 97 कार्यादेश काढले होते. यामध्ये नाग व पोहरा नदीच्या खचललेल्या संरक्षक भिंती आणि त्याच्या आसपासच्या रस्त्यांचा समावेश आहे. महापालिकेकडून कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी अनेक कामे अर्धवट आहेत. मुख्य कंत्राटदारांनी उप कंत्राटदार नेमूण ही कामे दिल्याने याचा दर्जा किती चांगला असेल याबाबतही साशंकता आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी केली आहे.
अर्धवट कामे, माती, गाळ पडून
नदी, नाल्यांच्या संरक्षक भिंतीच्या कामांना अनेक महिने आधी सुरूवात झाली असली तरी अजूनही अनेक कामे पूर्ण झालेली नाहीत. दुसरीकडे नदी, नाल्यांची स्वच्छता सुरू असून यातून काढण्यात येणारा कचरा, गाळ व इतर साहित्य आजूबाजूलाच टाकण्यात येत असल्याने पुन्हा हा कचरा त्यात जात आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gfS89yN
No comments:
Post a Comment