अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड शहर गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरले आहे. जुना वाद मिटवण्यासाठी एकत्र आलेल्या तिघांपैकी एकाने दोघांवर गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. रविवारी सकाळी शहरात वसरणी भागातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ ही घटना घडली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक जीवंत काडतूसही सापडले आहे.शेख परवेज (वय २५) असे मृताचे नाव आहे. तर तेजासिंग बावरी हा जखमी झाला असून त्याला विष्णुपुरी येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.धक्कादायक म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच शहरातील गुरुद्वारा परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी दोघांवर गोळीबार केला होता. या गोळीबाराची चर्चा थंडावत असताना आज ११ मे ला सकाळी पुन्हा गोळीबाराची घटना घडली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आशु पाटील उर्फ कमलेश लिंबापुरे याच्यासह शेख परवेज, तेजासिंग बावरी या तिघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. प्रारंभी किरकोळ असलेला हा वाद टोकाला जाऊन यातून कमलेश लिंबापुरे उर्फ आशु पाटील याने शेख परवेज व तेजासिंग बावरी यांच्यावर गोळी झाडली. यात शेख परवेज (वय २५) हा जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला तेजासिंग बावरी हा जखमी झाला. मयत शेख परवेज हा दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला जीव गमवावा लागला. तीन महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. या गोळीबारात जखमी झालेल्या तेजासिंग बावरी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या घटनेने नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/VRBibLC
No comments:
Post a Comment