Breaking

Friday, May 16, 2025

यशोगाथा! तीन लेकरांच्या माउलीने जिंकली दहावीची कसोटी; भीमवाडीत अभ्यासिका चालवून मिळविले यश https://ift.tt/oQn3GY4

नाशिक : सिलिंडरच्या स्फोटात विस्कटलेले इतरांचे संसार सावरताना तिने वस्तीतील लेकींसाठी अभ्यासिका सुरू केली. विशेष म्हणजे, स्वत: आठवीपर्यंत शिकलेली असताना गरीब वस्तीतल्या लेकींनी प्रगती करावी, यासाठी गंजमाळ झोपडपट्टीतील नेहा पगारे यांनी सर्व जिद्द पणाला लावली. या प्रवासात स्वत:चा तब्बल १३ वर्षांपूर्वी खंडित झालेला शैक्षणिक प्रवास दहावीच्या परीक्षेस बहिस्थ विद्यार्थिनी म्हणून पुन्हा सुरू केला. तीन लेकरांची माय असलेल्या नेहा पगारे यांनी दिवसभर संसाराला हातभार लावून मध्यरात्री दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत तब्बल ८४ टक्के गुण मिळविले आहेत.बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या नेहा पगारे यांचे बालपण गरिबीच्या छायेत गेले. लहान वयातच त्यांचा विवाह झाल्याने आठवीपर्यंत शिक्षण मर्यादित राहिले. गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टीत संसार थाटल्यानंतरही त्यांच्या आयुष्यातील संघर्ष कायम राहिला. तीन मुलांचा सांभाळ, सासरी बेताची परिस्थिती यातून मार्ग काढताना त्यांची शिक्षणाची आस मात्र शमली नाही....अन् पुन्हा शिक्षणप्रवासकरोनाच्या काळात नेहाताईंच्या वस्तीत सिलिंडर स्फोटाने हाहाकार माजला. वस्ती उद्ध्वस्त झाली; पण नेहाताईंनी खचून न जाता आपल्या माणसांना सावरले. आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड यांसारख्या कागदपत्रांसाठी त्यांनी शासनदरबारी पायपीट केली. कधी विनवण्या तर व्यवस्थेसोबत संघर्ष केला; पण वस्तीतील प्रत्येक व्यक्तीला आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्याचे त्यांचे ध्येय अटळ राहिले. यादरम्यान बापट शैक्षणिक चॅरिटेबल ट्रस्टशी त्यांची गाठ पडली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वस्तीतील मुलांसाठी अभ्यासिका सुरू केली. याच वेळी त्यांनी १३ वर्षांपूर्वी तुटलेली शिक्षणाची नाळ पुन्हा जोडण्यासाठी दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरला. पुस्तके गोळा करणे, संसार, मुलांचा अभ्यास आणि रात्री ११ ते २ या वेळेत अभ्यास करणे, अशी त्यांची दिनचर्या होती. अनेक अडचणींना तोंड देत, कष्टाला साथ देत त्यांनी दहावीत ८४ टक्के गुण मिळवून जिद्द सिद्ध केली.नेहाताई आपल्या यशाचे श्रेय सासूबाई, पती आणि आई-वडिलांना देतात. त्यांच्या या यशाने गंजमाळच्या झोपडपट्टीत आनंदाचे वातावरण पसरले आहे. 'इच्छाशक्ती आणि मेहनतीपुढे कोणतीही अडचण मोठी नाही, असा संदेश त्यांच्या कहाणीतून मिळतो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xkdgMBj

No comments:

Post a Comment