प्रशांत श्रीमंदिलकर, लोणावळा, पुणे : लोणावळा परिसरातील वलवण धरणात दुर्दैवी घटना घडली आहे. धरणात बुडून एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निलेश शिंदे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. वृत्तानुसार, निलेश हा त्याच्या १२ मित्रांसह लोणावळ्यात फिरायला आला होता. वरसोली परिसरातून ते वलवण धरणाच्या बाजूला गेले. तिथे पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या निलेशला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही घटना घडताच स्थानिकांनी तातडीने शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीमला माहिती देण्यात आली.सूचना मिळताच रेस्क्यू टीम त्वरित साहित्यासह घटनास्थळी दाखल झाली. पाणबुडीच्या साहाय्याने त्यांनी निलेशचा मृतदेह शोधून बाहेर काढला. या शोधकार्यात वैभव दुर्गे, योगेश दळवी, मयूर दळवी, सागर दळवी, कपिल दळवी, आकाश मोरे, रोहित मोरे, महेश मसने, कुणाल कडु, महादेव भवर, पिंटू मानकर, सतीश सागर आणि सुनील गायकवाड यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने घडलेली ही दुर्घटना लोणावळ्यातील धरण परिसरात पर्यटकांनी खबरदारी बाळगण्याची गरज अधोरेखित करत आहे. या घटनेमुळे निलेशच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात शोककळा पसरली आहे. त्यामुळे पर्यटकांनी फिरायला येताना काळजी घ्यावी, आपल्या स्वतःच्या जीवावर बेतेल असे कुठलेही धाडस करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अशीच एक दुर्दैवी घटना सांगलीतील पर्यटकासोबत घडली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली येथील पर्यटक रत्नागिरी येथे आले होते. त्यावेळी आरे वारे समुद्र किनारा पॉईंटवरून त्यांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. गाडी बाजूला पार्क केली होती. पण कारला हॅन्ड ब्रेक लावलेला असतानाही एक कार थेट समुद्राच्या दिशेने खोल दरीत कोसळली. सुदैवाने ही कार कोसळली त्यावेळी गाडीत कोणी नसल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र, या दुर्घटनेत कारचे मोठे नुकसान झालं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/om0rlVA
No comments:
Post a Comment