म.टा.खास प्रतिनिधी,मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेत शालेय शिक्षण विभागाने हिंदी सक्तीची वाट मंगळवारी मोकळी केल्यानंतर बुधवारी याचे तीव्र पडसाद उमटले. हिंदी भाषा सक्तीची करण्याचा घाट घातल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले. तर शिक्षक, विद्यार्थी यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर टीकेची झोड उठवली. आमच्या भाषेचा सन्मान राखण्यात येणार नसेल, तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. काँग्रेसनही हिंदीची सक्ती न लादण्याची भूमिका मांडली. हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र वगळता पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा इतर कोणत्याही राज्यात शिकवल्या जात नाहीत, असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत हिंदीबाबतच्या निर्णयावरून अनेक प्रश्न उपस्थित केले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्येही त्याची सक्ती नाही. हिंदी ही मुळात राष्ट्रभाषा नाही. ती एका राज्याची भाषा आहे. मग महाराष्ट्रातच तिची सक्ती का,' असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. याप्रकरणी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना हिंदी न शिकविण्याचे आवाहन करणारे पत्र पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. 'राज्यातील कोवळ्या मुलांवर ही भाषा का थोपविली जात आहे. उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे का? काही आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा प्रयत्न आहे,' असा आरोपही त्यांनी केला. 'सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल, तर हा महाराष्ट्रद्रोह समजू,' असे त्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना बजावले.
'मराठी भाषेवर वरवंटा फिरेल'
'आमचा हिंदी किंवा कोणत्याही भाषेला विरोध नाही. कोणतीही भाषा सुंदरच असते. मात्र, महाराष्ट्रातच हा प्रकार का?, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार, तिथे मराठी शिकवणार का? ', असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.'सर्व मुख्याध्यापकांना पत्र'
राज ठाकरे यांनी राज्य सरकार, तसेच महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्रही पाठविले आहे. हिंदी भाषा किंवा एकूणच तिसरी भाषा शिकवली जाणार नाही, याचे लेखी पत्र हवे, असे आम्ही सरकारला ठासून सांगितले आहे. ते पत्र काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्रद्रोह समजू हे नक्की, असे राज यांनी मुख्याध्यापकांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले.'इतर भाषेसाठी २० पटसंख्या हवी'
'हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान २० इतकी असणे आवश्यक राहील, असे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी नमूद केले.'हा संघाचा अजेंडा'
'राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट आहे. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे, असे शिक्षणतज्ज्ञही सांगतात. भाजपला मात्र हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा व संस्कृती संपवायची आहे', असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी केला. हिंदू, हिंदी आणि हिंदूराष्ट्र हा संघाचा अजेंडा देवेंद्र फडणवीस राबवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/aBw873Q
No comments:
Post a Comment