संजय घारपुरे : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या क्रिकेट कसोटीत भारताच्या तळाच्या फलंदाजांनी झटपट नांगी टाकली होती. त्यासाठी त्यांना पूर्ण जबाबदार न धरता जम बसलेला असताना अजून दिर्घ खेळी केली असती तर जास्त धावा झाल्या असत्या अशी टिपणी शुभमन गिलने केली होती. त्याच गिलने दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी खेळपट्टीवर तळ ठोकला. शुभमन गिलने दुसऱ्या सामन्यात नाबाद ११४ धावांची दमदार खेळी साकारली, त्यामुळेच भारताने बुधवारी पहिल्या दिवशी आपल्या पहिल्या डावात ५ बाद ३१०अशी मजल मारता आली.प्रथम गोलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात यशस्वी जयस्वालला शतकापासून रोखण्यात यश आले होते. उपाहारापूर्वी जयस्वालने करुण नायर आणि गिलच्या साथीत इंग्लंडच्या गोलंदाजांना ताज्या खेळपट्टीचा फायदा घेता येणार नाही ही काळजी घेतली होती. मात्र चहापानानंतर १० चेंडूंत तीन धावांत दोन विकेट घेत इंग्लंडने हादरे देण्यास सुरुवात केली. निम्मा संघ परतल्यामुळे पहिल्या कसोटीच्या आठवणी ताज्या झाल्या, पण गिलने भक्कम तळ ठोकला होता. तो कोणताही धोका पत्करण्यास तयार नव्हता. त्याला रवींद्र जाडेजाची साथ लाभली आणि भारतीय डावाची कूर्मगतीने असली तरी भक्कम वाटचाल सुरू झाली. यशस्वी जयस्वाल पुन्हा इंग्लंडची डोकेदुखी ठरला. त्याने पहिल्या दोन सत्रात इंग्लंड गोलंदाजीस सतावले. त्याने इंग्लंडविरुद्धच्या सातही कसोटीत किमान पन्नास धावा करण्याची कामगिरी केली होती. मात्र त्याला चहापानापूर्वी स्टोक्सचा उजव्या यष्टीबाहेरील चेंडू मारण्याचा मोह आवरला नाही आणि तो शतकापासून १३ धावा दूर राहिला. जसप्रीत बुमराहला संघाबाहेर ठेवले असताना आपल्यावर जास्त जबाबदारी असल्याची कल्पना गिलला होती, त्याने हेच लक्षात घेऊन फलंदाजी केली. शतकापासून यशस्वीला रोखल्याचे समाधान इंग्लंडला लाभले असले तरी त्याने सकाळच्या सत्रात चांगला प्रतिकार केला होता. ख्रिस वोक्सने आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या राहुलला चकवले. वोक्सने सात षटकांत १५४ धावांच दिल्या होत्या. याच वोक्सच्या गोलंदाजीवर यशस्वी (१२) आणि करुण नायरविरुद्धचे (५) पायचीतचे अपील फेटाळले गेले होते. उपाहारापूर्वी सहा मिनिटे ब्रायडन कार्सने करुण नायरला तंबूत धाडले. मात्र त्यापूर्वी त्याने यशस्वीसह ८० धावा जोडल्या होत्या. करुणने प्रतिहल्ला सुरू केल्यावर यशस्वीने सुत्रे हाती घेतली होती.यशस्वीने धडाका सुरू केल्यावर अॅक्सलेटरवरील पाय काढला नाही. त्याने इंग्लंडच्या काहीशा स्वैर माऱ्याचा फायदा घेताना ५९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते. त्याने जोश टंगच्या तिसऱ्या षटकात सलग तीन चौकार मारले होते. त्याने नेमका संयम गमावला आणि स्टोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतरची पडझट गिलने जाडेजाच्या साथ रोखली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/yIsZEgu
No comments:
Post a Comment