दीपक जाधव, : बीड जिल्हा हा सुशिक्षित बेरोजगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. करोना काळात नोकरी गेली आता करायचं काय? वडिलोपार्जित 30 एकर क्षेत्र असून देखील पारंपारिक पिकातून उत्पन्न मिळत नव्हतं, अशा परिस्थितीत बीडच्या तरुणाने वेगळा प्रयोग केला आणि ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती केली. लागवड करत आता तरुण वर्षाकाठी लाखो रुपये कमवतो आहे. बीड सारख्या दुष्काळी आणि कमी पाण्याच्या भागात शेती करणं शेतकऱ्यांसाठी जिकरीचं काम असतं. मात्र यावर मात करत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथील तरुणाने पुण्यातील आयटीमधील नोकरी सोडून शेती सुरु केली. 3 वर्षात या तरुणाने या शेतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमाई केली. ड्रॅगन फ्रूटच्या शेतीने शेतकऱ्यांसाठी नवीन यशाचा मार्ग दाखवला आहे. जिल्ह्यातील सोलापूरवाडी येथील तरुण शेतकरी हनुमंत गावडे, शिक्षण एमटेक आणि त्यांची पत्नी कल्पना गावडे या देखील एमएससीपर्यंत शिकलेल्या. पुण्यात नोकरी करणाऱ्या दाम्पत्याने कोविडच्या काळात नोकरी सोडली आणि गावाकडे आले. कष्ट आणि नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने खडकाळ असलेलेल्या शेतीला समृद्ध केलं. तीन एकरावर ड्रॅगन फ्रूटची शेती उभी केली आणि आज या शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न निघत आहे. दुष्काळी भाग असल्याने कमी पाण्यावर येणारी, या भागातील परिस्थितीला पूरक पिकांवर अभ्यास करुन ड्रॅगन फ्रूटचे यशस्वीपणे पीक घेतलं आहे.ओसाड आणि खडकाळ असलेल्या माळरानावर हनुमंत गावडे यांची शेती आहे. या उतारावरील असलेल्या शेतीवर काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यांनी कमी पाण्यावर येणारी फळ-पिकं कोणती यावर अभ्यास केला, सुरुवातीला डाळिंबची लागवड केली होती. मात्र या शेतीतून हवं तसं उत्पन्न न मिळाल्याने त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचे ठरवलं. सुरुवातीला एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. त्यातून चांगलं उत्पन्न मिळाल्यानंतर आणखी 2 एकरावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. त्यातून त्यांना 3 वर्षात लाखो रुपये मिळाले आहेत.यासाठी त्यांनी जवळच शेततलावची निर्मिती केली आहे. यामध्ये पाणी साठून त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून ड्रॅगन फ्रूटची बाग फुलवली आहे. त्यासाठी शासनाच्या सोलर योजनेचा लाभ घेतला आहे. माळरानाच्या शेतीत पारंपारिक पिकं घेण्यापेक्षा फळपिकांत वेगळा प्रयोग करण्याचा विचार करत हनमुंत गावडे यांनी अभ्यास केला. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागातील ड्रॅगन फ्रुट लागवड, तेथील पाणी, माती, तापमान आणि बाजार व्यवस्थापन याचा अभ्यास केला आणि ड्रॅगन फ्रूट लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ४ वर्षांपूर्वी फलटण येथून ड्रॅगन फ्रूटची रोपं आणून त्याची 7 बाय 10 आकारात लागवड केली. एका एकरात 2400 रोपं लागली. ड्रॅगन फ्रूट फळाची बाजारातील मागणी, तेथील दराचा आढावा घेऊन ते स्वतः याची विक्री करतात. पहिल्या वर्षी 2022 मध्ये ड्रॅगन फ्रुटचं 4 टन, तर 2023 मध्ये त्याहून अधिक टनापर्यत उत्पादन निघालं. साधारणपणे प्रति किलोसाठी 110 ते 120 रुपयांपर्यत दर मिळाला. मागणीनुसार नगर, पुणे सुरतला विक्री करतात.गावडे यांच्या पत्नी कल्पना या उच्चशिक्षित असून त्याही हनुमंत यांना शेतीसाठी मदत करतात. शेतीतील बहुतांश भाग त्या सांभाळतात. नुकताच त्यांना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते वसंतराव नाईक फलोत्पादन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/mJtVw6x
No comments:
Post a Comment