पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलानं स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोक्यात गोळी लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रसन्न असं मृत मुलाचं नाव आहे. त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत काहीही कळू शकलेलं नाही. रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास चिंचवडे यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. चिंचवडमधील वाल्हेकरवाडी रस्त्यावर चिंचवडे कुटुंब राहतं. रात्री नऊच्या सुमारास प्रसन्न यानं कुटुंबासोबत जेवण केलं. त्यानंतर तो स्वत:च्या खोलीत गेला आणि वडिलाच्या परवानाधारक पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळी झाडल्याचा आवाज झाल्यानंतर कुटुंबीयांनी प्रसन्नच्या खोलीकडं धाव घेतली. तेव्हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. जखमी अवस्थेत प्रसन्नला थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fleQj1
No comments:
Post a Comment