मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी मोडकसागर तलाव गुरुवारी रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. सात धरणांत २८ जुलैला ६८.६ टक्के म्हणजे नऊ लाख ८५ हजार १३० दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. २५५ दिवसांचा हा साठा असून एप्रिलपर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता जवळपास मिटली असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाणीकपात मागे घेण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.पावसाने ओढ दिल्याने मुंबईत १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात लागू आहे. सात धरणांपैकी चार तलाव आठ दिवसांत तुडूंब झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र, जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने धरण क्षेत्रांतील पाण्याच्या पातळीने तळ गाठला होता. त्यामुळे पाण्याची चिंता वाढू लागली होती. जुलैच्या सुरुवातीपासून धरण क्षेत्रांत वरुणराजाची दमदार साथ मिळाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सात धरणांपैकी तुळशी तलाव २० जुलै रोजी मध्यरात्री १.२८ मिनिटांनी, विहार २६ जुलै रोजी मध्यरात्री १२.४८ वाजता, तर तानसा २६ जुलै रोजी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी त्यानंतर गुरुवार रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी मोडकसागर ओसंडून वाहू लागल्याने मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.दरम्यान, मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सात धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. २८ जुलै रोजी सातही धरणात नऊ लाख ८५ हजार दशलक्ष लिटरहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.सात धरणांतील पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)अप्पर वैतरणा ९७,१४१मोडक सागर १,२८,९२५तानसा १,४४,४७५मध्य वैतरणा १,५४,२४९भातसा ४,२४,५९६विहार २७,६९८तुळशी ८,०४६तीन वर्षांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)२०२३ ९,८५,१३०२०२२ १२,७६,११६२०२१ १०,१३,८७०
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PGobUxM
No comments:
Post a Comment